विदर्भातील किमान तापमानात लक्षणीय घट; मध्य महाराष्ट्र, कोकणात आल्हाददायक वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 11:04 PM2020-11-04T23:04:21+5:302020-11-04T23:08:10+5:30
उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून बर्फ पडायला सुरुवात झाली आहे.
पुणे : विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३६ अंश सेल्सिअस तसेच सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत तब्बल ६.५ अंशाने घटले आहे.
उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून बर्फ पडायला सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर अजून वाढलेला नसल्याने सध्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात आल्हाददायक वातावरण आहे. दिवसा काहीचे कडक ऊन आणि सायंकाळनंतर गारवा असे चित्र दिसत आहे. राज्यातील आणखी एक आठवड्यानंतर थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अनेक ठिकाणी रात्रीचा पारा सरासरीच्या तुलनेत घसरला आहे. चंद्रपूरमध्ये मंगळवारी सकाळी किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस नोंदविले होते. त्यात आज एकाच दिवसात ३ अंशाने घट होऊन १२.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
पुणे शहरात किमान तापमान १५.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते सरासरीच्या तुलनेत ०.७ अंश सेल्सिअसने कमी आहे़ पुढील काही दिवस पुण्यातील किमान तापमान हे सरासरीच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे १५.१, लोहगाव१६.९, जळगाव १५.२, कोल्हापूर १९.४, मालेगाव १७.४, नाशिक १५.४, सांगली १८.३, सातारा १६.५, सोलापूर १६.४, मुंबई २५, सांताक्रुझ २३.६, रत्नागिरी २२.५, पणजी २४.२, डहाणु २३.५, औरंगाबाद १६.३, परभणी १४, नांदेड १७, बीड १६, अकोला १५.६, अमरावती १३, बुलढाणा १६.६, चंद्रपूर १२.२, गोंदिया १३.६, नागपूर १२.८, वाशिम १४.२, वर्धा १४.४़