कांदा रडवणार! आवक घटल्याने मुंबईत दरामध्ये लक्षणीय वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 03:19 AM2021-02-11T03:19:25+5:302021-02-11T07:02:29+5:30
मुंबई बाजार समितीमध्ये कांदा ३८ ते ४२ रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये कांद्याने पन्नाशी ओलांडली आहे.
नवी मुंबई : अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादनाला बसला असून राज्यभर कांद्याची आवक घसरू लागली आहे. मुंबईतही आवक कमी होत असून दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये कांदा ३८ ते ४२ रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये कांद्याने पन्नाशी ओलांडली आहे.
राज्यात वर्षभरापासून कांदा दरामध्ये वारंवार चढउतार होऊ लागले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी होऊ लागली आहे. राज्यात बहुतांश सर्वच बाजारपेठांमध्ये आवक कमी होत आहे. मुंबई बाजार समिती मध्येही एक आठवड्यापासून आवक कमी होऊ लागली असल्यामुळे दरामध्ये वाढ होत आहे. होलसेल मार्केटमध्ये डिसेंबर महिन्यात कांदा २० ते २८ रुपये दराने विकला जात होता.
सद्यस्थितीमध्ये हे दर ३८ ते ४२ रूपयांवर गेले आहेत. किरकोळ मार्केमध्येही ५० रुपये दराने कांदा विकला जात आहे. पुढील किमान एक महिना कांदा दरामध्ये तेजी राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून आवक सुरळीत होण्यास किमान एक महिना लागू शकेल.
- अशोक वाळुंज, संचालक,
कांदा बटाटा मार्केट
मुंबई बाजार समितीमधील
प्रतिकिलो बाजारभाव
महिना बाजारभाव
डिसेंबर २० ते २८
जानेवारी २६ ते ३१
फेब्रुवारी ३८ ते ४२
राज्यातील बुधवारचे
बाजारभाव पुढीलप्रमाणे
बाजारसमिती बाजारभाव
मुंबई ३८ ते ४२
कोल्हापूर २० ते ५०
सातारा १५ ते ३८
औरंगाबाद १० ते ३९
लासलगाव १० ते ३९