रोहयोच्या मजुरांत लक्षणीय वाढ
By Admin | Published: April 28, 2016 06:01 AM2016-04-28T06:01:52+5:302016-04-28T06:01:52+5:30
मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे़ पाणीटंचाईमुळे मजुरांना शेतावर काम मिळत नसल्यामुळे ते रोजगार हमी योजनेच्या कामांकडे वळत आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे़ पाणीटंचाईमुळे मजुरांना शेतावर काम मिळत नसल्यामुळे ते रोजगार हमी योजनेच्या कामांकडे वळत आहेत. परिणामी या महिन्यात मजूर संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ६ हजार ७४४ कामांवर १ लाख ३ हजार ६९ मजूर होते, तर तिसऱ्या आठवड्यात मजुरांच्या संख्येत तब्बल ६२ हजार ४०८ ने वाढ झालेली आहे़ एकूण ९ हजार १०४ कामांवर १ लाख ६५ हजार ४७७ मजूर आहेत. मजुराला प्रतिदिन १९१ रुपये मजुरी मिळत असून, मराठवाडा विभागात नोंदणीकृत मजूर संख्या ५४ लाख ३० हजार ८४९ इतकी आहे़ यातील २० लाख २७ हजार २६७ मजुरांना जॉबकार्ड देण्यात आले आहे.
मध्यंतरीच्या काळात रोहयोच्या कामांवर असलेल्या मजुरांची संख्या झपाट्याने कमी झाली होती़ जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेचा तालुकानिहाय आढावा घेऊन रोहयो कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी आणि मागेल त्याला काम उपलब्ध करून द्या, अशा सूचना विभागीय प्रशासनाने दिल्या़ त्यानंतर त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सर्वाधिक मजूर हे बीड जिल्ह्यात आहेत़ १९४८ कामांवर ४९ हजार ८४१ मजूर आहेत़ त्याखालोखाल मजुरांची संख्या लातूर, जालना जिल्ह्यांत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने आणि मजुरीही चांगली मिळत असल्याने बहुसंख्य लोक औरंगाबादमध्येच काम करीत आहेत़ त्यामुळे रोहयोत कमी मजूर औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. ती संख्या केवळ ७ हजार ७५४ इतकी आहे.
>मद्य कारखान्याच्या पाणीकपातीचे प्रशासनाचे आदेश
अहमदनगर : जिल्ह्यातील मद्य कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करण्याचे आदेश बुधवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिले़ कारखान्यांच्या दैनंदिन पाण्याची मागणी तपासून ही कपात करण्यात येणार आहे. जिल्ह्यात असे १० कारखाने असून त्यातील बहुतांश साखर कारखान्यांशी संलग्न आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मद्यनिर्मिती व इतर उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे आदेश मंगळवारी दिले. या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत बुधवारी सायंकाळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या दालनात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यात दहा मद्यनिर्मितीचे कारखाने आहेत़ त्यापैकी कर्मवीर सहकारी साखर कारखाना, संजीवनी सहकारी साखर कारखाना आणि डॉ़ विठ्ठलराव विखे कारखान्यांना थेट कॅनॉलद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो़ या कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात कपात करून वाचणारे पाणी दुष्काळी भागांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे़
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगाच्या पुरवठ्यात देखील २० टक्के कपात करण्यात येणार आहे़ बुधवारपासून २० टक्के आणि १० मेपासून १० जूनपर्यंत आणखी ५ टक्के म्हणजे, एकूण २५ टक्के कपात होईल