वीज बिलात सवलतीचे संकेत; उद्धव ठाकरे बैठक घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 06:48 AM2020-11-20T06:48:05+5:302020-11-20T06:48:40+5:30
मुख्यमंत्री घेणार स्वतंत्र बैठक; मंत्रिमंडळात चर्चा, पण निर्णय नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आकारलेल्या वाढीव बिलात सवलत दिली जाणार नाही, अशी भूमिका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घेतली असली तरी या बाबत राज्य सरकार पुनर्विचार करणार असल्याचे संकेत गुरुवारी मिळाले. ऊर्जा मंत्र्यांच्या भूमिकेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर या सवलतींबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली.
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि सवलती देण्याबाबत फेरविचार झाला पाहिजे अशी मागणी काही मंत्र्यांनी बैठकीत केली. त्यावर याविषयी राऊत यांच्यासोबत स्वतंत्रपणे बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या हल्ल्यानंतर सरकार नरमाईचे धोरण घेणार, असे दिसते.
राऊत यांनी गुरुवारी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि लॉकडाऊन काळातील ३ महिन्यांच्या वीज बिलात सवलती देण्यासाठी ऊर्जा विभागाने दिलेल्या निधीच्या प्रस्तावावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली.
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्य सचिव संजय कुमार यांनी महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात घेतलेले निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी यासंदर्भात सादरीकरण केले.
१,८०० कोटी रुपयांची
ऊर्जा विभागाची मागणी आहे. आर्थिक अडचणीमुळे एवढी रक्कम देण्याबाबत अजित पवार राजी नसल्याचे समजते. आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.