प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात आमूलाग्र बदलाचे संकेत
By admin | Published: October 21, 2015 12:56 AM2015-10-21T00:56:56+5:302015-10-21T00:56:56+5:30
सध्या आपल्या देशाची ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल सुरू असल्याने पिढी घडवणारा शिक्षकही त्याच पद्धतीने प्रशिक्षित असायला हवा, या उद्देशाने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात
पुणे : सध्या आपल्या देशाची ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल सुरू असल्याने पिढी घडवणारा शिक्षकही त्याच पद्धतीने प्रशिक्षित असायला हवा, या उद्देशाने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याचे ठरत आहे. संगणकाचे प्रशिक्षण, व्होकेशनल इंग्रजी, कृतीवर आधारित शिक्षण असे थेट शिक्षकांना समृद्ध करणारे विषय पदविका अभ्यासक्रमात घेण्याचे नियोजन
आहे, अशी माहिती या अभ्यासक्रमासाठी नेमण्यात आलेल्या कोअर समितीचे अध्यक्ष डॉ. अ. ल. देशमुख यांनी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने २००५मध्ये शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (एनसीटीई)ने त्यांच्या विविध प्रकाशनांद्वारे मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या स्तरावर समिती नेमण्यात आली आहे. एनसीटीईने तयार केलेल्या अभ्यासक्रमावरून महाराष्ट्राच्या स्थानिक परिस्थितीत त्याची पुनर्रचना कशी करता येईल, अद्ययावत कसे करता येईल, यासाठी ही समिती काम पाहील. शासनाने यासाठी समिती जाहीर केली आहे. ही समिती ३१ आॅक्टोबरपर्यंत नवीन अभ्यासक्रम शासनाला सादर करणार आहे.
या समितीच्या कामकाजाबाबत डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘एनसीटीईच्या अभ्यासक्रमात स्थानिक पातळीच्या अनुषंगाने बदल करून त्याची पुनर्रचना करण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये डिजिटल इंडिया ही संकल्पना लक्षात घेऊन अभ्यासक्रमात प्रत्येकाला संगणक कसा हाताळता येईल, याकडे लक्ष दिले जाईल. यासाठी पहिल्या वर्षी संगणक हाताळणे आणि दुसऱ्या वर्षी संगणकाचा योग्य वापर करून मुलांना विविध विषयांची गोडी लावता येणे याअनुषंगाने प्रशिक्षण देण्याचा विचार आहे. त्याचबरोबर शिक्षकाने आपल्या स्थानिक भाषेबरोबरच इंग्रजीत ही प्रभुत्व मिळवायलाच हवे यासाठी ‘व्होकेशनल इंग्रजी’ विषयाला अंतर्भूत करणार आहोत. योग शिक्षणाचीही माहिती दिली जाणार आहे. याचबरोबर सध्या कृतीवर आधारित शिक्षणाचा कल वाढत असल्याने आणि शिक्षणप्रवाहात नवनवे विचार रूढ
होत असल्याने त्याप्रमाणे अभ्यासक्रमाची रचना करण्याचे विचाराधीन आहे.’’(प्रतिनिधी)
एनजीओ मॉडेलचा विचार
राज्यात शिक्षक प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काही स्वयंसेवी संस्था उत्तम काम करीत आहेत. त्यांनी तयार केलेल्या मॉड्युलना यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांना विनंती करून त्यांचे यशस्वी मॉड्युलचे सादरीकरण करून त्यातील चांगल्या बाबी घेण्यास उत्सुक आहोत. आय टीच, मुक्तांगण, मुंबई, कनेक्ट इंडिया यासारख्या ५ स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत.
अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. समितीत इतर १३ सदस्य आहेत. यामध्ये डॉ. नवनाथ तुपे, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. उमेश प्रधान, मधुकर बानुरी, जुमाना रामपूरवाला, डॉ. हनुमंत नारायण जगताप, भूषण पाटील, डॉ. दत्तात्रय तापकीर, डॉ. मेधा गुळवणी, डॉ. रमा भोसले, देवेंद्र देवणीकर, डॉ. सर्जेराव ठोंमरे, रेणू दांडेकर यांचा समावेश आहे.