रेशीम विणकरांना मिळणार हातमाग!
By admin | Published: October 6, 2015 04:17 AM2015-10-06T04:17:26+5:302015-10-06T04:17:26+5:30
राज्यात पारंपरिकरीत्या रेशीमपासून साडी, वस्त्र विणण्याच्या व्यवसायाला बळकटी मिळावी, तसेच पारंपरिक हातमाग समूहातील विणकरांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा व त्यातून त्यांना
अकोला : राज्यात पारंपरिकरीत्या रेशीमपासून साडी, वस्त्र विणण्याच्या व्यवसायाला बळकटी मिळावी, तसेच पारंपरिक हातमाग समूहातील विणकरांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा व त्यातून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, या हेतूने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत हातमाग पुरविण्यात येणार आहे. राज्यातील १०० विणकरांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्याकरिता शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, ४० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
राज्यात हातमागावर तुती रेशीम/साडी निर्मितीचे काम प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील येवला, नागपूर जिल्ह्यातील कामठी, भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव, मोहाडी येथे पारंपरिकरीत्या सुरू आहे. या पारंपरिक व्यवसायाला बळकटी देण्यासाठी तसेच विणकरांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा, या हेतूने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत हातमाग पुरवठा करण्याचा प्रस्ताव संचालक (रेशीम) यांनी शासनाला सादर केला होता. या प्रस्तावानुसार राज्यातील १०० विणकरांना हातमाग पुरवठा करण्याचे नियोजन आहे. सदर प्रस्ताव राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीने मंजूर केला असून, त्याला प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी होते. शासनाने ५ आॅक्टोबर रोजी या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देतानाच राज्यातील १०० विणकरांना हातमाग पुरवठा करण्यासाठी प्रतिहातमाग ४० हजार याप्रमाणे ४० लाख रुपये व प्रकल्पाच्या प्रशासकीय खर्चाकरिता १.८० लाख, असा एकूण ४१.८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. सदर योजना रेशीम संचालनालयाने निश्चित केलेल्या कार्यक्षेत्रात तसेच विहित कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी संचालक (रेशीम) यांच्यावर टाकण्यात आली आहे.