भाजपात उपऱ्यांची चांदी, निष्ठावंतांमध्ये खदखद
By admin | Published: June 1, 2016 04:33 AM2016-06-01T04:33:06+5:302016-06-01T04:33:06+5:30
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कालपरवा पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने भाजपात प्रचंड खदखद आहे
मुंबई : विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कालपरवा पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने भाजपात प्रचंड खदखद आहे. पंधरा वर्षानंतर राज्यात सत्ता आली त्यामुळे प्रामाणिकपणे पक्ष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळणे अपेक्षित असताना ऐनवेळी धनदांडग्या उपऱ्यांना उमेदवारी बहाल करण्याच्या धोरणावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी भाजपाकडून सहाजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे या दोन मित्रपक्षातील उमेदवारांचा समावेश आहे. तर, भाजपाचे सुजितसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, आर.एन. सिंह, प्रसाद लाड यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या मनोज कोटक यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. सुजितसिंह ठाकूरांचा अपवाद वगळता भाजपाचे अन्य तीनही उमेदवार अलीकडेच पक्षात दाखल झाले आहेत. वर्षानुवर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी बाहेरुन आलेल्यांना संधी देण्यात आल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. मुंबई भाजपाचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी दरेकर यांच्या उमेदवारीचा पक्षाने फेरविचार करावा, अशी मागणी आधीच केली आहे. (प्रतिनिधी)घोडेबाजार होणार
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाचे पाच उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात असताना ऐनवेळी भाजपाने सहावा उमेदवार जाहीर केल्याने मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार एकूण ९ जागांपैकी भाजपाचे ५, शिवसेनेचे २ तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला ३ जागा येतात.
घोडेबाजार टाळण्यासाठी विधान परिषदेची निवडणुक बिनविरोध व्हायला हवी, असा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. मात्र, आता भाजपानेच सहावा उमेदवार उभा केल्याने अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असून यात भाजपाच्या सहाव्या उमेदवाराने आणि बंडखोराने अर्ज मागे न घेतल्यास निवडणुका आणि घोडेबाजार अटळ आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र, पक्षात कोणतीही बंडखोरी होणार नाही, असा दावा केला आहे.
ही निवडणूक बिनविरोध करायची तर भाजपाच्या एका उमेदवाराला आणि कोटक यांनाही माघार घ्यावी लागणार आहे. नेमक्या कोणत्या उमेदवाराला भाजपा माघार घ्यायला सांगेल या बाबतची उत्सुकता कायम आहे.