चांदी दर पोहोचला नीचांकी पातळीवर
By admin | Published: November 6, 2014 08:56 PM2014-11-06T20:56:08+5:302014-11-06T22:01:03+5:30
येत्या काही दिवसांमध्ये हाच भाव २० हजारांच्या घरात येण्याची भीती
हुपरी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड आॅईल आवकही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. औद्योगिक क्षेत्र आणि नाणी उत्पादकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीमध्ये प्रचंड घट झाली आहे. या सर्व घडामोडींचा विपरीत परिणाम चांदीच्या भावावर झाल्याने गेल्या पाच वर्षांतील नीचांकी दराचे रेकॉर्ड यावेळी तयार झाले आहे. सन २०१३ मध्ये ऐतिहासिक अशा ७२ हजार प्रतिकिलो भावाचे रेकॉर्ड निर्माण करणारा चांदीचा भाव आज केवळ ३५ हजारांच्या घरात खेळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये हाच भाव २० हजारांच्या घरात येण्याची भीती आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा सर्वांत जास्त परिणाम हा चांदीच्या दरावर होत असतो. संपूर्ण जगभरातील विविध उद्योगांमध्ये प्रतिवर्षी सात हजार ५०० टन चांदी वापरली जाते. धनाढ्य शक्ती व सट्टेबाजारांकडून या संधीचा गैरफायदा उठविण्यासाठी चांदीची संपूर्ण बाजारपेठच हायजॅक करण्याच्या घटना वेळोवेळी घडत असतात. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांनी जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेले मंदीचे वातावरण, अमेरिकेची कोलमडलेली अर्थव्यवस्था, डॉलरची झालेली घसरण, औद्योगिक व नाणी उत्पादकांकडून ओसरलेली मागणी या सर्व घटनाक्रमांचा परिणाम चांदीच्या भावावर निश्चितपणे झाल्याने मागील वर्षी असणारा ७२ हजार रुपयांच्या भाव जोरदार घसरू लागला आहे.
या भावाने चांदी उद्योगाच्या इतिहासात सर्रास उच्चांकी भाव असे ऐतिहासिक रेकॉर्ड निर्माण केले
होते. हाच भाव घसरत घसरत २०१४ च्या सुरुवातीस ५८ हजारांच्या
घरात खेळू लागला. टप्प्याटप्प्याने यामध्येही घट होत असून, गेल्या सहा महिन्यांमध्ये चांदीचा भाव ३५ हजारांच्या घरात आल्याचे पाहावयास मिळत आहे. अमेरिकन प्रशासनाने अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी व डॉलरची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होत असलेली घसरगुंडी थांबविण्यासाठी भरभक्कम अशा पर्यायांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्याने शेअरबाजारानेही चांगलीच उसळी मारली आहे. परिणामी शेअरबाजार वधारला जाऊन डॉलरची आपोआप घसरगुंडी थांबली गेली. याचा उलटा परिणाम मात्र क्रुडआॅईलच्या दरावर झाल्याचे पाहावयास मिळत आहे.