एकाच दिवसात चांदीत ४,४०० रुपये वाढ; तर सोने चकाकले एक हजाराने, किती झाला दर?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 06:14 AM2024-09-14T06:14:29+5:302024-09-14T06:15:01+5:30
सोन्याचे भाव पोहोचले ७३,९००; तर चांदी गेली ८७ हजार रुपयांवर
जळगाव - गेल्या अनेक दिवसांपासून थोडाफार चढ-उतार सुरू असलेल्या सोने-चांदीच्या भावात शुक्रवारी मोठी वाढ झाली. एकाच दिवसात चांदीच्या भावात चार हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८७ हजार रुपये प्रति किलो तर सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ते ७३ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. अमेरिकन आर्थिक स्थितीचा परिणाम झाल्याने ही भाववाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
गेल्या महिन्यापासून सोन्याचे भाव ७२ हजारांपासून कमी-जास्त होत राहिले व गुरुवारी ते ७२ हजार ९०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर शुक्रवारी त्यात थेट एक हजार रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
कशाचा परिणाम?
अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिकच डळमळीत असून बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याचे संकेत आहेत. अर्थव्यवस्थेच्या स्थितीमुळे गेल्या काही दिवसात तेथील ४५० कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. आगामी काळात बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने सोने-चांदीकडे गुंतवणुकीचा कल वाढला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिक सुशील बाफना यांनी सांगितले.