5 % जागा जिंकणाऱ्यांना एकसमान निवडणूक चिन्ह

By Admin | Published: January 23, 2017 04:52 AM2017-01-23T04:52:22+5:302017-01-23T04:52:22+5:30

मागील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत किमान पाच टक्के जागा जिंकणाऱ्या नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या सर्व उमेदवारांना

A similar election symbol for winning 5% of seats | 5 % जागा जिंकणाऱ्यांना एकसमान निवडणूक चिन्ह

5 % जागा जिंकणाऱ्यांना एकसमान निवडणूक चिन्ह

googlenewsNext

मुंबई : मागील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत किमान पाच टक्के जागा जिंकणाऱ्या नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या सर्व उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात एकच निशाणी देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडील मान्यताप्राप्त पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या अधिकृत निशाणीवर निवडणूक लढविता येते. केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता नसलेल्या मात्र राज्य निवडणूक आयोगाकडील इतर नोंदणीकृत पक्षांना उरलेल्या चिन्हांमधून एक चिन्ह देण्यात येते. परंतु एखाद्या विशिष्ट चिन्हाची एकापेक्षा अधिक पक्षांनी मागणी केल्यास लॉटरीद्वारे चिन्हाचे वाटप केले जाते. त्यामुळे एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकाच पक्षाच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागते. यात दुरुस्ती करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश २००९मध्ये राज्य निवडणूक आयोगाने सुधारणा केली आहे. त्यानुसार नोंदणीकृत राजकीय पक्षाने एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागील निवडणुकीत एकूण जागांपैकी किमान पाच टक्के जागा जिंकल्या असल्यास त्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात एकच चिन्ह देण्याची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण सदस्य संख्येच्या पाच टक्के जागा या एकापेक्षा कमी येत असल्यास किमान एक जागा तरी जिंकलेली असणे आवश्यक आहे. एकसमान चिन्हासाठी संबंधित पक्षांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या दिनांकापासून किमान तीन दिवस आधी सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज करावा. अर्जासोबत मागील निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांची यादी आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सचिवांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकांसाठी आयुक्त; तर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी सक्षम प्राधिकारी असतील. संबंधित राजकीय पक्षास प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. एकापेक्षा जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांनी एकसमान चिन्हाची मागणी केल्यास प्रथम अर्ज प्राप्त झालेल्या पक्षास ते चिन्ह देण्यात येईल व अन्य पक्षास किंवा पक्षांना उर्वरित मुक्त चिन्हांमधून एका चिन्हांची मागणी करण्याची संधी देण्यात येईल, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: A similar election symbol for winning 5% of seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.