पर्यावरणस्नेही शहरांसाठी सिमन्स, हिताचीचा हात, दर्शविली राज्य शासनासोबत काम करण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:35 AM2018-01-26T03:35:47+5:302018-01-26T03:36:51+5:30
सिमन्स आणि हिताची या प्रमुख उद्योगसमुहांनी पर्यावरणस्नेही शहरांसाठी राज्य शासनासोबत काम करण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिका-यांशी या संदर्भात दाओसच्या भेटीत चर्चा केली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सिमन्स आणि हिताची या प्रमुख उद्योगसमुहांनी पर्यावरणस्नेही शहरांसाठी राज्य शासनासोबत काम करण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिका-यांशी या संदर्भात दाओसच्या भेटीत चर्चा केली.
सिमन्सच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य सेड्रिक निक यांच्याशी चर्चा केली. स्मार्ट शहरे निर्माण करतानाच ती अधिकाधिक पर्यावरणानुकूल करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत यावेळी विस्ताराने चर्चा झाली. अशा शहरांच्या निर्मितीसाठी एक समग्र व्यवस्था उभारण्याकरता महाराष्ट्र शासनासोबत अधिक सहकार्याचे आश्वासन आश्वासन निक यांनी दिले.
हिताची इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भारत कौशल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात पथदर्शी प्रकल्प उभारणीसाठी आमची कंपनी सहकार्य करेल, असे कौशल यांनी सांगितले. पिकांच्या उत्पादकता वाढीसंदर्भात तंत्रज्ञान पुरविण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते. स्वित्झर्लंडच्या पर्यावरण, वाहतूक, ऊर्जा आणि संवाद विभागाच्या मंत्री डोरिस ल्यूथर्ड यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. शहरे प्रदूषणमुक्त करण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.
मुख्यमंत्री-मित्तल चर्चा-
पोलाद निर्मितीत जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या आर्सेलर मित्तल कंपनीचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल यांनी दाओस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गुंतवणुकीबाबत चर्चा केली.
भारतामध्ये स्पेशल आॅटोमोबाईल ग्रेड स्टील प्लँट उभारण्याचे नियोजन आर्सेलर मित्तल कंपनी करीत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी मित्तल यांना केली.