Sindhudurg DCC Bank Election: संतोष परब हल्ल्यातील संशयित भाजपचे मनिष दळवी विजयी, भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 11:45 AM2021-12-31T11:45:45+5:302021-12-31T11:45:58+5:30
महाविकास आघाडीच्या समृद्धी सहकारी पॅनेलचे प्रमुख आणि शिवसेनेचे विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत पराभूत.
सिंधुदुर्ग: संतोष परब मारहाण प्रकरण आणि नंतर झालेल्या कोर्ट कचेरीमुळे गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालात संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी विजयी झाले आहेत.
आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 जागांसाठी मतमोजणी झाली. या निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित आरोपी असलेले भाजपचे उमेदवार मनिष दळवी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विलास गावडेंचा पराभव केला आहे.
विद्यमान अध्यक्षांचा पराभव
आज झालेल्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीच्या समृद्धी सहकारी पॅनेलचे प्रमुख आणि शिवसेना नेते तसेच विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकारी पॅनेलचे उमेदवार विठ्ठल देसाई यांच्यात चुरशीची लढत झाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली. अखेर या लढतीचा निकाल ईश्वरचिठ्ठीद्वारे लागला. त्यामध्ये विठ्ठल देसाई यांनी बाजी मारली.
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली पराभूत
तसेच, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक पंचवार्षिक निवडणूकीसाठी पतसंस्था मतदार संघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली विरुद्ध शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात झालेल्या लढतीत सुशांत नाईक यांनी राजन तेलींचा पराभव केला आहे. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू विजयी
भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने राणे समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. राणे समर्थकांनी फटाके फोडून विजयाचा जल्लोष केला. जिल्हा बँकेसाठी 98 .67 टक्के मतदान झाले होते. तर, 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होत.