सह्याद्री पट्ट्यात वळीव पावसाने शेतकऱ्यांची दैना, विजेच्या तारांवर फांद्या पडल्याने वीज गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:17 IST2025-04-02T12:15:55+5:302025-04-02T12:17:09+5:30
Sindhudurg News:

सह्याद्री पट्ट्यात वळीव पावसाने शेतकऱ्यांची दैना, विजेच्या तारांवर फांद्या पडल्याने वीज गायब
कनेडी - कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांना मंगळवारी सायंकाळी वळिवाच्या वादळी पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने हजेरी लावल्याने बेगमीसाठी ठेवलेले सामान झाकून ठेवताना शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून परिसरातील मार्ग बंद झाले होते.
विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडून तुटल्याने वीजही गायब झाली होती. दरम्यान, सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कणकवली शहर आणि परिसरातही काही काळ पावसाची रिमझिम सुरू होती. गेले दोन दिवस हवेत मोठी उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे पाऊस पडणार याची चाहूल नागरिकांना लागलीच होती. त्याचबरोबर हवामान विभागानेही ऑरेंज अलर्ट देत वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे मंगळवारी वळिवाच्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडवून दिली. ठिकठिकाणी उभारून ठेवलेली भाताची उडवी भिजून गेली आहेत.
वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आंबा, काजूलाही पावसामुळे मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे चोहोबाजूने नुकसान झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. पावसाळी वातावरण निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी चारा व उडवी झाकून ठेवल्या आहेत.
सह्याद्री पट्ट्यात बरसला
मंगळवारी सायंकाळी वादळी पावसाने सह्याद्रीच्या पट्ट्यातील नाटळ, दिगवळे, नरडवे, कुंभवडे या गावांना झोडपून काढले.
शेतकऱ्यांनी मशागत करण्यासाठी शेतात ठेवलेला पालापाचोळा भिजून गेला.