सिंधुदुर्गातील नेत्यांनी फक्त लाचारी दिली : मनोहर पर्रीकर
By admin | Published: October 13, 2014 10:47 PM2014-10-13T22:47:34+5:302014-10-13T23:08:04+5:30
टोलवरून राडा करणाऱ्या राणे पुत्राला मी गोव्यात धडा शिकवला. तुम्ही त्यांना तडीपार करा.
कणकवली : सिंधुदुर्गातील नेत्यांनी येथील जनतेला फक्त लाचारी, गुंडगिरी दिली. गोव्यापेक्षा चांगला निसर्ग असूनही दळीद्री, उन्मत्त व भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांमुळे येथे विकास झाला नाही. भाजपा जिल्ह्यात खिजगणतीत नव्हती आणि आता विराट स्वरूप दिसत आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोलताना केले. ते कासार्डे येथील भाजपाच्या प्रचारसभेत बोलत होते.पर्रीकर म्हणाले की, जिल्ह्यात हॉटेल व्यवसाय सुरू करायचा झाल्यास राणे पितापुत्रांना २६ टक्के भागिदारी द्यावी लागते. कुडाळ येथील हिरोहोंडा शोरूममध्ये ती मिळाली नाही म्हणून गाड्या जाळण्यात आल्या. अशा प्रवृत्तीला धडा शिकवा. टोलवरून राडा करणाऱ्या राणे पुत्राला मी गोव्यात धडा शिकवला. तुम्ही त्यांना तडीपार करा.
प्रमोद जठार म्हणाले की, आता विकासाचे पर्व सुरू झाले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत विकास घडवून दाखवू. केंद्र्रातील सरकारने राज्याला महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार कोटी दिले. सत्ता दिली तर महाराष्ट्राच्या विकासासाठी ५० हजार कोटी आणू. भाजपा कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तरी सोडणार नाही. भाजपाच्या माध्यमातून राज्यपाल आले आणि सिंधुदुर्गचा कॉँग्रेसचा जिल्हापरिषद अध्यक्ष तडीपार झाला. आता तुम्ही राणे पुत्राला तडीपार करा.
माजी आमदार अजित गोगटे म्हणाले की, आप्पा गोगटेंच्या प्रचारासाठी गोपीनाथ मुंढे नंतर प्रमोद महाजनांची सभा झाली होती. त्यावेळी गोगटेंचा विजय झाला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने जठारांना विजयाची निश्चिती मिळाली आहे.
गोव्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोव्याच्या तुलनेत सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा कुचकामी आहे. जिल्ह्यातील विकासकामांकडे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे दुर्लक्ष झाले आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असूनही येथे बेरोजगारी राहिली. जिल्ह्याला लाभलेले समुद्रकिनारे चांगले असूनही पर्यटनाचा विकास करण्यात येथील नेत्यांना यश आलेले नाही. (प्रतिनिधी)
नरेंद्र मोदींच्या सभेची क्षणचित्रे
विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्गात झालेल्या आतापर्यंतच्या गर्दीचा उच्चांक पंतप्रधान मोदींच्या सभेला झाला होता.
भाजपाकडून बूथनिहाय बसेस सोडण्यात आल्या होत्या. सुमारे २०० हून अधिक बसेस यांच्यासह कार, दुचाकीवरून सभेसाठी लोक जमले होते.
सभास्थानापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. लोकांनी तेथून चालत सभास्थान गाठले.
महिला आणि पुरूषांसाठी वेगवेगळी आसनव्यवस्था ठेवण्यात आली होती. सभास्थानावर प्रत्येकाला तपासूनच आत सोडण्यात आले. पाण्याची बाटली आदी वस्तू सभास्थळी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १.५५ वाजता सभास्थळी आगमन झाले. २ वाजता मोदींनी बोलण्यास सुरूवात केली आणि २.२५ वाजता त्यांनी आपले भाषण संपवले.
पंतप्रधानांचे स्वागत जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, रेश्मा जोशी, तन्वी मोदी आदींनी केले.
सभेपूर्वी आणि सभेनंतर महामार्गावर वाहने आणि लोकांची रांग लागली होती.