सिंधुदुर्गची ‘दफ्तरनोंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2017 05:23 AM2017-02-07T05:23:27+5:302017-02-07T05:23:27+5:30
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या गॅझेटीअर डिपार्टमेंट यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटीअरची निर्मिती करण्यात येणार आहे
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या गॅझेटीअर डिपार्टमेंट यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटीअरची निर्मिती करण्यात येणार आहे. याविषयी नुकतीच दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ.दिलीप बलसेकर यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व इतिहास संशोधकाची बैठक घेतली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गॅझेटिअरमध्ये एकूण १२ प्रकरणे आहेत. जिल्ह्याचा भूगोल, इतिहास, लोक राहणीमान, जीवनमान, उद्योगधंदे, कृषी व जलसिंचन, प्रशासन, संस्कृती, प्रेक्षणीय स्थळे, सामाजिक सेवा या व अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकणारा संदर्भपूरक ग्रंथ असणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्या संबंधित विषयाच्या अनुषंगाने माहिती संकलन करून योगदान करावे, असे आवाहन गॅझेटिअर विभागाने केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड व किल्ले, तेथील बोलीभाषा, साहित्य, कविता, तेथील यात्रा व उत्सव या विषयावर समग्रपणे माहिती गॅझेटिअरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा ग्रंथ निर्माण करण्याच्या दृष्टीने दर महिन्याला दुसऱ्या सोमवारी गॅझेटीअरसाठी नियुक्त केलेल्या सदस्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येईल. हे गॅझेटीअर सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगाच्या दृष्टीने केवळ पुस्तक रूपातच न राहता ई-बुक स्वरुपातही येणार आहे. त्यासाठी आवश्यक ध्वनीचित्रफित हे जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती डॉ.बलसेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)