Sindhutai Sapkal Emotional Story: ते चाफ्याचे झाड आजही आहे, पण फुलांत खरकटे वेचून खाणारी सिंधुताई हरपली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 10:03 AM2022-01-05T10:03:25+5:302022-01-05T10:14:46+5:30
Sindhutai Sapkal Passed Away: हजारोंची माय २८२ जावई, ४९ सुना, ३५० मुलाची आई, हाफ टाईम शिकलेली तेही चौथी वरपास आणि २२ देशात फिरून आलेली ही नऊवारी, वयाच्या १२ वर्षी जग संपलं. तेव्हा सुन्न झाले होते.
- नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गुरुजी तुम्ही ज्ञानदाते आहात. तुम्हीच घडवू शकता उद्याचा भारत. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांवरही प्रेम करा, विद्येपासून कुणीही वंचित राहू नये, याची तमा बाळगा. परिस्थिती फार गंभीर आहे. माझ्या महाराष्ट्रातील गुरुजींनो, पगारासाठी नव्हे, तर विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यादानाचे काम करा समस्त शिक्षकांना हा मूलमंत्र देणाऱ्या आमच्या माई, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.
समाजसेवेचा एक अध्याय संपुष्टात आला असला तरी त्यांनी उभारलेली चळवळ सुरू असणार आहे. हजारो अनाथांना आपुलकीची मायेचा आधार देणारी आणि साक्षात ईश्वरी अंश समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांनी ३ सप्टेंबर २०२० रोजी 'लोकमत'शी साधलेला विशेष संवाद कायम स्मरणात राहणार आहे.
प्रेताच्या निखाऱ्यावर भाकरी भाजून खाणारी ती हजारोंची माय
हजारोंची माय २८२ जावई, ४९ सुना, ३५० मुलाची आई, हाफ टाईम शिकलेली तेही चौथी वरपास आणि २२ देशात फिरून आलेली ही नऊवारी, वयाच्या १२ वर्षी जग संपलं. तेव्हा सुन्न झाले होते. एकाकी लढा दिला. स्मशानात राहणारी ती, भीक मागणारी ती जळणाऱ्या प्रेताच्या निखान्यावर भाकरी भाजून खाणारी, मोहम्मद रफीचे गाणे खूप आवडायचे. मोहम्मद रफीचे गाणे खूप आवडायचे. रस्त्यावर कुठेही सुरु असले की, थांबून त्यांचे गाणे ऐकायचे. त्या परिस्थितीत गाण्याने कस तरी एकटाईमच खाणं दिलं. आता भाषणातून राशन मिळतं. तेच मुलांना खाऊ घालते. माझ्या एकाही शाळेला अनुदान नसल्याचे सिंधुताई नेहमी सांगायच्या.
वांदिले मास्तरनी पिटलं, कांबळेंनी गोंजारलं
शाळेत उशिरा यायचे म्हणून वांदिले गुरुजी खूप मारायचे, तर माझी काही तरी अडचण असेल म्हणून मी उशिरा आले. हे समजून कांबळे गुरुजी मला खूप प्रेम करायचे, हे सांगताना दोन्ही गुरुचेच महत्त्व अधोरेखित करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आई आज हरपली आहे.
खरकटं उचलून खाणारी झाली अनाथांची माय
वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे हे सिंधुताईचे गाव. तेथील उत्तर बुनियादी शाळेत त्या शिकल्या. त्या शाळेतील चाफ्याचे झाड आजही आहे. म्हशी पाण्यात बसल्या की, शाळेत जायचे, मुलाचे खरकटे चाफ्याच्या फुलात वेचून खायचे. लोकांना वाटायचे. त्या फुल वेचत आहेत.
माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला. घरातून हाकलून दिल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडलेली सिंधुताई परिस्थितीवर मात करत पिचलेल्या महिलांची आणि अनेक अनाथ बालकांची आई झाली.
- यशोमती ठाकूर, पालकमंत्री
संबंधीत बातम्या...
“माझी मुलं कशी आहेत, लेकरांची काळजी घ्या”; अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांचे अखेरचे शब्द
'नकुशी' ते अनाथांची माय, अनेकांच्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या माईंचा असा होता खडतर प्रवास
.. तेव्हा व्हील-चेअरवरुन सिंधुताई राजदरबारात गेल्या, राष्ट्रपतीही आले होते धावून