बेशिस्त वाहतुकीमुळे सिंधूताई सपकाळ संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 04:49 AM2017-01-20T04:49:30+5:302017-01-20T04:49:30+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील बेशिस्त वाहतूक, बेदरकारपणे वाहने चालवणारे चालक हे आता सर्वांच्याच अंगवळणी पडले आहे.
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील बेशिस्त वाहतूक, बेदरकारपणे वाहने चालवणारे चालक हे आता सर्वांच्याच अंगवळणी पडले आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे डोळ्यांसमोर होणाऱ्या अपघातातून वाचल्यानंतर अनाथांची माय असणाऱ्या सिंधूताई सपकाळ मात्र चांगल्याच संतप्त झाल्या. त्यांनी आयआरबीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. १० दिवसांत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई न केल्यास एक्स्प्रेस-वेवर आंदोलन करण्याचा इशाराही सिंधूतार्इंनी दिला.
बुधवारी मध्यरात्री मुंबईहून पुण्याकडे येत असताना त्यांना वाहतुकीच्या बेशिस्तीचे दर्शन झाले. आपल्या डोळ्यांसमोर टळलेला अपघात पाहून त्या चांगल्याच संतप्त झाल्या. तळेगावजवळच्या उर्से टोलनाक्यावर आल्यानंतर त्यांनी नाक्यावरील आयआरबी कर्मचारी आणि व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले. पैसे घेऊनही वाहतूक असुरक्षित आहे, आणखी किती जीव घेणार, अशा शब्दांत सिंधूतार्इंनी जाब विचारला. बेदरकारपणे वाहने चालवणारे चालक, अवजड वाहने यामुळे द्रुतगती महामार्गावर प्रवास करणे अत्यंत असुरक्षित झाले आहे. प्रत्येक जण जीव मुठीत घेऊनच प्रवास करीत असतो. येत्या १० दिवसांत बेशिस्त वाहनधारकांचा बंदोबस्त नाही केला तर हजारो नागरिकांना रस्त्यावर उतरवून मी इथे आंदोलन करीन, असा इशारा त्यांनी दिला. मार्इंचा हा राग पाहून कर्मचारी निरुत्तर झाले होते. काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावे यानेही एक्स्प्रेस-वेवरील बेशिस्त वाहतुकीबाबत सोशल मीडियावर भाष्य केले होते. (प्रतिनिधी)