गायक अंकित तिवारीला पाच हजार रुपयांचा दंड
By admin | Published: May 17, 2016 05:55 AM2016-05-17T05:55:22+5:302016-05-17T05:55:22+5:30
अर्जावरील युक्तिवादासाठी वारंवार मुदत वाढवून मागितल्याप्रकरणी सोमवारी विशेष महिला न्यायालयाने गायक अंकित तिवारीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
मुंबई : बलात्कार प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात यावे, यासाठी केलेल्या अर्जावरील युक्तिवादासाठी वारंवार मुदत वाढवून मागितल्याप्रकरणी सोमवारी विशेष महिला न्यायालयाने गायक अंकित तिवारीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
यापूर्वी २० एप्रिल आणि २५ एप्रिल रोजी अंकित तिवारी सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मात्र त्याच्या वकिलाने वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज केल्याने सत्र न्यायालयाने वॉरंटला स्थगिती दिली. परंतु, वॉरंट रद्द करण्यास नकार दिला. ‘जोपर्यंत आरोपी न्यायालयात हजर राहत नाही, तोपर्यंत वॉरंट रद्द करणार नाही,’ असे विशेष न्यायालयाच्या न्या. अंजु शेंडे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर तिवारीच्या वकिलाने या प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात यावे, यासाठी न्यायालयात अर्ज केला.
यापूर्वी ४ मे रोजी अंकित हजर न राहिल्याने १६ मेपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली. मात्र सोमवारच्या सुनावणीतही अंकित गैरहजरच राहिला. नाराज झालेल्या न्यायालयाने अंकितला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावत १९ मे रोजी या अर्जावर सुनावणी ठेवली आहे.
अंकितने २०१२ ते २०१३ या कालावधीत अनेक वेळा बलात्कार केल्याची तक्रार एका विवाहितेने केली होती. विशेष न्यायालयाने अंकितवर आरोप निश्चित केले. संबंधित महिलेची या संबंधांना सहमती होती, असे अंकितने उच्च न्यायालयाला सांगितले. उच्च न्यायालयाने त्याच्यावरील आरोप रद्द केले. अंकितने विशेष महिला न्यायालयात आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे. (प्रतिनिधी)