ठाण्यातील ‘सिंघम’ संजीव जयस्वाल
By admin | Published: May 13, 2017 02:13 AM2017-05-13T02:13:56+5:302017-05-13T02:13:56+5:30
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कठोर प्रशासक आहेतच, पण प्रशासनावर कुणी हात उगारला तर ते सिंघमसारखे दबंग होऊ शकतात,
संदीप प्रधान।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कठोर प्रशासक आहेतच, पण प्रशासनावर कुणी हात उगारला तर ते सिंघमसारखे दबंग होऊ शकतात, याची प्रचीती गुरुवारी ठाणेकरांना आली. अडेलतट्टू व्यापाऱ्यांना त्यांनी यापूर्वी वठणीवर आणलेच. आता बेशिस्त फेरीवाले व मुजोर रिक्षाचालकांचे कंबरडे मोडण्याची हिंमत जयस्वाल यांनी दाखवली आणि त्याला पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची साथ लाभली, तर ठाणेकर या दोघांना निश्चित दुवा देतील.
महापालिका उपायुक्त संदीप माळवी हे बुधवारी फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेले असताना फेरीवाल्यांच्या रूपातील काही गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली. माळवी यांच्यावर हात उचलणे, म्हणजे प्रशासनावर हात उगारण्यासारखे असल्याने जयस्वाल आक्रमक झाले आणि त्यांनी गावदेवी येथील गाळेधारक व फेरीवाले यांना इंगा दाखवला. ठाण्यातील रिक्षाचालक तर मुजोरीचा कळस आहे. रिक्षाचालकांवरही सिंघमसारखे तुटून पडलेल्या जयस्वाल यांच्यावर ठाणेकर मनापासून खूश झाले आहेत.
जुन्या ठाण्यातील रस्ते अरुंद असून सध्या या परिसरातील वाहतूक प्रचंड वाढली आहे. अनेक दुकानदार, हॉटेल, बार यांनी रस्त्यांवर बिनदिक्कतपणे अतिक्रमण करून रस्ते रुंदीकरणात वर्षानुवर्षे खोडा घातला होता. जयस्वाल यांनी अल्पावधीत २०० ते २५० दुकानदारांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यामुळे खवळलेल्या दुकानदारांनी महापालिकेशी असहकार केला. मात्र जयस्वाल हे वेळप्रसंगी वज्राहून कठोर होऊ शकतात, हे लक्षात आल्यावर यांच्यात समेट घडून आला. जयस्वाल यांनी मोकळे व रुंद केलेले रस्ते फेरीवाल्यांनी काबीज केले आणि पालिकेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला. १९६०-७० च्या दशकात बेरोजगार मराठी मुलांना रोजगार मिळावा, याकरिता शिवसेनेनेच फेरीवाला संस्कृती पोसली. त्या वेळी फेरीवाले व वडापावच्या गाड्यांवर कारवाई करणाऱ्या गो.रा. खैरनार यांनाही शिवसेनेकडून विरोध झाला होता. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बहुमत प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाचे खच्चीकरण केले जात असल्याचे जयस्वाल यांनी केलेले सूतोवाच बोलके आहे. कालांतराने फेरीवाला ही गरज न राहता धंदा झाला व माफियांनी या धंद्यावर कब्जा केला. वेगवेगळ्या शहरांमधील रस्त्यांचे या माफियांनी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. त्यावर, फेरीचा व्यवसाय करण्याकरिता स्थानिक राजकारणी, गुंड यांना हप्ता द्यावा लागतो. फेरीचा व्यवसाय करू दिला जावा, याकरिता हे माफिया महापालिका कर्मचाऱ्यांना हप्ता देतात. त्यामुळे कारवाई होत नाही. रिक्षा व्यवसायाचेही तेच आहे. गरीब तरुणांच्या रोजगाराकरिता रिक्षा परवाने दिले गेले. मात्र, आता हा व्यवसायदेखील माफियांनी गिळला आहे. अनेक स्थानिक राजकारणी, वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी, गुंड यांनी आपला अवैध पैसा रिक्षा धंद्यात गुंतवला आहे. त्यांनी या रिक्षा अत्यल्प मोबदला देऊन चालवायला दिल्या आहेत. रिक्षा चालवणारे चक्क गुंडगिरी करतात. जयस्वाल यांनी परमबीर यांच्या सहकार्याने या मुजोर फेरीवाले व रिक्षावाल्यांचे कंबरडे मोडणे गरजेचे आहे. मात्र कारवाई करताना अधिकृत गाळेधारकांवर कारवाई केल्याने त्याला खीळ बसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.