देशासाठी एकच संवाद प्रतिमान अशक्य; अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे पितामह डॉ. एकनाथ चिटणीस यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 12:07 PM2024-07-28T12:07:23+5:302024-07-28T12:08:07+5:30

नावाजलेल्या शास्त्रज्ञांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याशी साधलेला खास संवाद... 

single communication paradigm for the country is impossible said father of space research program dr eknath chitnis | देशासाठी एकच संवाद प्रतिमान अशक्य; अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे पितामह डॉ. एकनाथ चिटणीस यांचे प्रतिपादन

देशासाठी एकच संवाद प्रतिमान अशक्य; अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे पितामह डॉ. एकनाथ चिटणीस यांचे प्रतिपादन

सचिन दिवाण, प्रिन्सिपल करस्पॉंडन्ट,मुलाखत :  भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे बीजारोपण करण्यापासून त्याचे वटवृक्षात रूपांतर होण्यापर्यंतच्या वाटचालीत सक्रिय योगदान देणारे ऋषितुल्य संशोधक डॉ. एकनाथ चिटणीस यांनी  गुरुवार, 25 जुलै राेजी वयाच्या शंभरीत पदार्पण केले. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासारखे पंतप्रधान आणि विक्रम साराभाई, डॉ. होमी भाभा यांसारख्या द्रष्ट्या शास्त्रज्ञांच्या बरोबरीने देशाच्या वैज्ञानिक क्षेत्राची पायाभरणी करण्यासह माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांसह अनेक नावाजलेल्या शास्त्रज्ञांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याशी साधलेला खास संवाद... 

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात संवादाचे एकच प्रतिमान तयार करणे अशक्य आहे. अमेरिकेत बसून भारताच्या प्रश्नांवर बोलणे योग्य नाही. भारताचे प्रश्न सोडवण्यासाठीचे संशोधन येथील जनतेची स्थिती समजूनच केले पाहिजे. ते करताना संशोधकांची भूमिका नम्र विद्यार्थ्यांप्रमाणे असली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. एकनाथ चिटणीस यांनी केले.

देशात कृत्रिम उपग्रहांवर आधारित संवाद व्यवस्थेचा पाया रचण्यात डॉ. चिटणीस यांचे मोलाचे योगदान आहे. दूरचित्रवाणी प्रसारणाला सुरुवात करताना झालेल्या सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपरिमेंट (साइट) आणि खेडा कम्युनिकेशन प्रोग्राम (केसीपी) या प्रयोगांची रचना आणि अंमलबजावणीत त्यांचा सहभाग होता. त्यानंतर आज मोठी संवादक्रांती झाली आहे. मात्र, संवादसाधनांच्या गर्दीत मूळ संवादच हरवला आहे. यावर मत व्यक्त करताना डॉ. चिटणीस यांनी सांगितले की, जगभरात सर्वत्र हीच स्थिती आहे. त्याने निराश न होता संवाद तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करण्यावर भर दिला पाहिजे.

जागतिक ख्यातीचे अमेरिकी संवादशास्त्रज्ञ विल्बर श्रम यांच्याबरोबर डॉ. चिटणीस यांनी काम केले आहे. आजच्या परिस्थितीला अनुसरून तशा प्रकारचे भारतीय संवाद प्रतिमान विकसित करण्याची गरज आहे का, असे विचारले असता डॉ. चिटणीस यांनी सांगितले की, भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात असे एकसाची संवाद प्रतिमान विकसित करणे अवघड आहे. साइट आणि खेडा प्रयोगावेळी आम्हांला त्याचे वेळोवेळी प्रत्यंतर आले. आम्ही एखादा संशोधन आराखडा तयार करून स्थानिक जनतेत जात होतो आणि दरवेळी जनता आम्हाला आश्चर्याचे धक्के देत होती. आमच्या संशोधनापेक्षा त्यांचे प्रश्न वेगळेच असत. मग आम्हाला त्यांच्या गरजांनुसार संशोधन आराखड्यात बदल करावे लागत. जनतेत जाताना संशोधकांची भूमिका नम्र असली पाहिजे. मला सर्व कळते, असा पवित्रा चुकीचा आहे. आपण अज्ञानी आहे, हे कळल्यावरच संवादशास्त्राचा खरा विद्यार्थी बनता येते. त्याने आपल्यात एक नम्र भाव येतो. त्यातून आपल्याला जनतेच्या खऱ्या गरजा ओळखता येऊन त्यानुसार संशोधनाचा आराखडा ठरवता येतो.

देशात संशोधनासाठी आवश्यक असणारी योग्य मनोभूमिका तयार होणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, शिक्षणाचा दर्जा उंचावणे, संशोधकांना वैचारिक आणि कामाचे स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. शिक्षण आणि संशोधनाची नाळ मातीशी जुळलेली असण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

डॉ. एकनाथ चिटणीस यांचे शिक्षण, कामगिरी आणि पुरस्कार...­

- पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. भौतिकशास्त्र 

- डॉ. विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत संशोधन

- अमेरिकेतील एमआयटी येथे प्राध्यापक ब्रुनो रॉसी यांच्याबरोबर वैश्विक किरणांवर संशोधन

- इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या समितीचे सदस्य-सचिव 

- थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन (टर्ल्स)च्या उभारणीत मोलाचा वाटा

- इस्रोच्या स्पेस ॲॅप्लिकेशन सेंटरचे संचालक

-१९८५ मध्ये पद्मभूषण पुरस्कार 

विकासासाठी अंतराळ कार्यक्रम

चीनने भारतावर १९६२ मध्ये केलेल्या आक्रमणानंतर अनेक महिन्यांनी २० टक्के जनतेला याची माहिती होती. संवाद व्यवस्थेतील दरी भरून काढण्यासाठी, शेतीच्या विकासासाठी, नैसर्गिक साधन संपदेच्या प्रभावी वापरासाठी उपग्रह तंत्रज्ञान उपयोगी ठरेल, हे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना टेलिव्हिजन हे मध्यमवर्गाच्या करमणुकीचे साधन वाटत असे. त्यांच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी यांना या तंत्रज्ञानाचे देशाच्या विकासातील महत्त्व पटले आणि त्यांच्या कार्यकाळात अंतराळ संशोधन कार्यक्रमाला वेग आला.  - डॉ. एकनाथ चिटणीस 

 

Web Title: single communication paradigm for the country is impossible said father of space research program dr eknath chitnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.