एकच चर्चा... बाद नोटा खर्चा

By admin | Published: November 11, 2016 01:51 AM2016-11-11T01:51:41+5:302016-11-11T01:51:41+5:30

मुलीच्या वाढदिवसासाठी कालच एटीएममधून पैसे काढून आणले आहेत; पण १०००, ५०० च्या नोटाच रद्द झाल्याने वाढदिवस कसा साजरा करायचा?

Single discussion ... postnatal expenses | एकच चर्चा... बाद नोटा खर्चा

एकच चर्चा... बाद नोटा खर्चा

Next

पुणे : मुलीच्या वाढदिवसासाठी कालच एटीएममधून पैसे काढून आणले आहेत; पण १०००, ५०० च्या नोटाच रद्द झाल्याने वाढदिवस कसा साजरा करायचा? अडीनडीला उपयोगी पडतील म्हणून जपून ठेवलेले पैसेही आता बाहेर काढावे लागणार आहेत. बँकेसमोर रांगा लावूनही पाहिजे तेवढी रक्कम मिळणार नाही. त्यामुळे लग्न समारंभासारखे कार्यक्रम कसे पार पडतील...? अशीच चर्चा शहरात दिवसभर सुरू होती. त्यातच १०००, ५०० च्या नोटा कशा खर्च कराव्यात, याबाबत एकमेकांना सल्ले दिले जात होते.
गुरुवारी सकाळी लवकरच बँका सुरू झाल्या असल्या, तरी शहारातील काही बँकांची एटीएम बंद होती. त्यात हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्द होणार असल्याने या नोटा खर्च कशा कराव्यात, यावर सकाळी बागेत मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांपासून चहाच्या टपरीवर, बसथांब्यावर, पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तसेच एकाच सोसायटीत किंवा चाळीत राहणाऱ्या महिलांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोटा कशा खर्च कराव्यात, एवढीच चर्चा केली जात होती.
प्रत्येक जण पाचशे, हजार रुपयांची नोट घेऊन दुकानात गेल्यावर कोणता प्रसंग घडला, हे आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगत होता. हजार, पाचशेच्या नोटा वीजबिल भरून संंपवाव्यात, असा विचार करून काही जण वीजबिल भरणा केंद्रात गेले. मात्र, नोटा चालत नसल्याने त्यांना परत यावे लागले. तसेच, ५०० रुपयांचे सुटे कुठून मिळतात का, याची विचारणा सुरू होती. त्यामुळे दिवसभर नोटांच्या खर्चावरच चर्चा रंगली.
शासनाने १००० व ५००च्या नोटा बंद करून चलनात आणलेल्या २००० रुपयांच्या गुलाबी रंगाच्या नवीन नोटा मिळविण्यासाठी बँकांसमोर सकाळपासून लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नवीन २०००
रुपयांची नोट हाती मिळाल्यानंतर नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.(प्रतिनिधी)

Web Title: Single discussion ... postnatal expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.