सिंहगडावर २ दिवस ‘नो एंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2016 12:55 AM2016-08-04T00:55:42+5:302016-08-04T00:55:42+5:30
पडझडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दरडी पडण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सिंहगड वनविभागाने दोन दिवस घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद केला
सिंहगड रस्ता : मुसळधार पावसाने ठिकठिकाणी घडणाऱ्या पडझडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दरडी पडण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सिंहगड वनविभागाने दोन दिवस घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद केला आहे. त्यामुळे पर्यटकांना गडावर न सोडण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
त्यातच सिंहगड घाटात दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी पर्यटकांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून स्थानिक वनधिकारी खबरदारी घेत आहेत.
वरिष्ठ स्तरावरून पर्यटकांच्या सुरक्षिततेसंदर्भात खबरदारी घेण्याची सूचना सिंहगड वनविभाग व घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीला दिल्या गेल्या.
त्या पार्श्वभूमीवर पावसाचा जोर कमी होईपर्यंत दोन दिवस गडावर पर्यटकांना सोडण्यात येणार नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी जहांगीर शेख यांनी सांगितले. (वार्ताहर)
>पर्यटकांची गैरसोय
खडकवासला, सिंहगड, पानशेत परिसरात अठ्ठेचाळीस तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे. घेरा सिंहगड परिसरात पावसाने मोठ्या प्रमाणात हाहाकार उडविला आहे. आतकरवाडी-सिंहगड पायथा रस्त्यावरील पूलही पाण्याखाली गेल्याने मंगळवारी आतकरवाडीचा परिसराशी संपर्क तुटला होता. त्यामुळे पर्यटक व ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली.