सायन-पनवेल महामार्ग गेला खड्ड्यांत
By admin | Published: July 22, 2016 01:39 AM2016-07-22T01:39:39+5:302016-07-22T01:39:39+5:30
सायन - पनवेल महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने वारंवार चक्का जाम होत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले असून, या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने २५ किलोमीटर अंतर असलेल्या सायन - पनवेल महामार्गाचे रूंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. जवळपास ८२५ कोटी रूपये खर्च करून २०१४ अखेर काम पूर्ण केले आहे. खारघरमध्ये ६ जानेवारी २०१५ ला टोल सुरू केला आहे. १० लेनचा रोड झाल्यानंतरही वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढली आहे. ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे रोडवर सर्वत्र खड्डे पडले आहेत.
वाशी, सानपाडा उड्डाणपूल, तुर्भे वाहतूक चौकी, शरयू हुंडाई शोरूम, शिरवणे उड्डाणपुलाची चाळण झाली आहे. सायंकाळी सानपाडा ते नेरूळ दरम्यान वाहतूक ठप्प होत आहे. पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते एक तास वेळ लागत आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविण्यासाठी पोलिसांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. परंतु बुजविलेले खड्डे दोन दिवसांत जैसे थे होत आहेत. वाहतूक कोंडीमुळे चालक त्रस्त आहेत. लवकरात लवकर कोंडी सोडवावी, अशी मागणी केली जात आहे.
खड्ड्यांमुळे महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सानपाडा येथे डंपर पलटी झाला होता. रोज सरासरी दोन अपघात मार्गावर होत आहेत. सायंकाळी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी छोटी वाहने पामबीच रोडवरून वळवावी लागत आहेत. बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होवून आंदोलन करावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. रूंदीकरणाच्या कामाची चौकशी करावी. कामाचा दर्जा निकृष्ट असेल तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
>राजकीय पक्षांना विसर
महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु या समस्येकडे शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी महामार्गाच्या कामाविषयी जनहित याचिका दाखल केली होती. परंतु नंतर याविषयावर मौन पाळले आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
>महामार्गावर सानपाडा व शिरवणे उड्डाणपूल, शरयू हुंडाई व तुर्भे पुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रोेज वाहतूक कोंडी होत असून याबाबत संबंधित विभागाला कळवले आहे.
- एस. पी. शिंदे,
पोलीस निरीक्षक, तुर्भे वाहतूक