सायन-पनवेल महामार्ग होणार खड्डेमुक्त !

By Admin | Published: October 3, 2016 02:54 AM2016-10-03T02:54:31+5:302016-10-03T02:54:31+5:30

सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडल्यानंतर अखेर टोल कंपनीला जाग आली आहे.

Sion-Panvel highway will be free of pits! | सायन-पनवेल महामार्ग होणार खड्डेमुक्त !

सायन-पनवेल महामार्ग होणार खड्डेमुक्त !

googlenewsNext


नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडल्यानंतर अखेर टोल कंपनीला जाग आली आहे. रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजविण्यासाठी १५ दिवसांचा आराखडा तयार केला असून, त्यानंतर कायमचा उपाय केला जाणार आहे. परंतु अशातच पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे यात त्यांना कितपत यश येईल, याबाबत साशंकता आहे.
सायन-पनवेल महामार्गावर दिवसाला लाखो छोट्या-मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असते. परंतु सद्यस्थितीला या मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत. अनेकदा खड्डे बुजविण्याचे काम होवूनही ते अधिक काळ टिकलेले नाही. त्यामुळे प्रवाशांत नाराजी आहे. अखेर हे खड्डे बुजविण्याचे काम सायन-पनवेल टोलवेज कंपनीने (एसपीटीपीएल) हाती घेतले आहे. त्याकरिता १५ दिवसांचा प्लान तयार करण्यात आला आहे. सुमारे २३ कि.मी. च्या सायन-पनवेल मार्गावर २.५ कि.मी. अंतरावर खड्डेच खड्डे आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवले जाणार असून पाऊस थांबल्यानंतर २५ आॅक्टोबर ते २५ डिसेंबर दरम्यान या खड्ड्यांवर कायमचा उपाय काढला जाणार असल्याचे एसपीटीपीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक गोपाल गुप्ता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एसपीटीपीएल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. त्यांनी आपसात वाद मिटवण्याकरिता न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्याकरिता समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे. टोलमधून छोटी वाहने वगळल्याने एसपीटीपीएल कंपनीला आर्थिक फटका बसला आहे. त्यावर नुकसानभरपाई म्हणून न्यायालयाच्या निर्देशानुसार पीडब्ल्यूडीने एसपीटीपीएल कंपनीला प्रतिमहिना ४ कोटी ६९ लाख रुपये परतावा द्यायचा आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून हा परतावा देखील मिळालेला नाही. त्याशिवाय ५१८ कोटींच्या अनुदानापैकी पीडब्ल्यूडीकडून दोन टप्प्यात मिळणारे ३९० कोटी रुपये अनुदान देखील मिळालेले नाही. यामुळे कंपनी आर्थिक संकटात असतानाही प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रयत्न करत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>सायन - पनवेल मार्गाच्या रुंदीकरणादरम्यान अनेक ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बनवले जाणार होते. परंतु मागील दीड वर्षापासून या भुयारी मार्गांचे काम अपूर्ण आहे.
अर्धवट अवस्थेतल्या या भुयारी मार्गांचे सध्या तळे झाले असून झालेल्या कामालाही तडे गेले आहेत. त्यामुळे भविष्यात हे भुयारी मार्ग बांधायला सुरवात केल्यास संपूर्ण बांधकाम नव्याने करावे लागणार आहे.
>मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याची संधी साधत टोल कंपनीने १५ दिवसांचा कृती आराखडा तयार केलेला आहे. अशातच दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे खड्डे बुजविण्याच्या या कामात टोल कंपनीला कितपत यश येईल याबाबत साशंकता आहे. तर पावसातही काम सुरूच राहिल्यास यापूर्वीच्या कामाप्रमाणेच हे काम देखील निकृष्ट ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: Sion-Panvel highway will be free of pits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.