सायन-पनवेल टोल ५०० कोटी रुपयांनी वाढविला : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:03 AM2017-08-02T01:03:18+5:302017-08-02T01:03:32+5:30
सायन-पनवेल महामार्गावरील टोलच्या कामाचा ठेका देताना जाणीवपूर्वक चांगले काम करणाºया कंपन्या स्पर्धेत येऊ नयेत, असे नियम केले गेले.
मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील टोलच्या कामाचा ठेका देताना जाणीवपूर्वक चांगले काम करणाºया कंपन्या स्पर्धेत येऊ नयेत, असे नियम केले गेले. शिवाय, हे काम १२०० कोटींचे असताना, ते १७०० कोटींचे दाखविले गेले. ते दाखवून बँकांकडून १,३०५ कोटींचे कर्ज घेतले गेले. स्वत:च्या खिशातून एक रुपया न घालता, बँकेतून पैसे ‘अॅडजेस्ट’ केले गेले, अशी खळबळजनक माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या कामात दोषी असणारे कोणत्याही पक्षातले असले, तरी त्यांना सोडले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
सायन-पनवेल महामार्गावरील टोलसंदर्भात आ. अशोक पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणात राजकीय दबाव येतील, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा, असे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणात जाणीवपूर्वक कंत्राटदाराला फायदा देण्यासाठी नियम बदलले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी त्यांच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून, गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केले असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अधिकाºयांवरही कारवाई केली आहे. संबंधित आयव्हीआरसीएल आणि केवायपीएल या दोन कंपन्या, त्यांचे संचालक आणि संबंधित अभियंते दोषी असून, एसईबी या प्रकरणाची चौकशी करीत आहे. चौकशीअंती दोषींना अटक करण्यात येईल.
संबंधित रस्ता खराब झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त करावा व त्याचा खर्च ठेकदाराकडून वसूल करण्याचेही आदेश त्यांनी आज दिले. छोटी वाहने बंद केल्यावर जो कॅश फ्लो देण्यात येतो, तोच निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी वापरावा, असेही निर्देश देण्यात येतील.