साईप्रसाद ग्रुपच्या भापकरला अटक
By admin | Published: December 6, 2015 01:15 AM2015-12-06T01:15:31+5:302015-12-06T01:15:31+5:30
गुंतवणूकदारांची सुमारे २ हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी साईप्रसाद ग्रुपचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब भापकर याला मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण
मुंबई : गुंतवणूकदारांची सुमारे २ हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी साईप्रसाद ग्रुपचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब भापकर याला मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने शनिवारी अटक केली आहे. त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जास्त नफा मिळवून देण्याच्या नावाखाली या समुहाने देशभरातील २० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली व गोवा येथील कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असल्याचे उपआयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले. सेबीचे सहाय्यक सरव्यवस्थापक अंकीत भन्साळी यांनी आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे. त्याचे अन्य संचालक व अधिकाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक १२ ते १८ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष या समूहाच्या गोव्यातील मे.साई प्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड (एसपीपीएल) व पुण्यातील साईप्रसाद फुडस लिमिटेड (एसपीएफएल) कंपनीकडून सभासदांना दाखविण्यात येत होते. भापकरने २००१पासून या व अन्य संलग्न कंपन्यांची स्थापना करून देशभरातील सभासदांकडून दोन हजार कोटी जमविले होते. मात्र त्याबाबत रिझर्व्ह बँक तसेच सेबीकडून आवश्यक नोंदणी, तसेच व्यवहारासाठी परवानगी घेण्यात आलेली नव्हती.
कंपनीचे असलेले उत्पन्न, गुंतवणूक, मालमत्ता विचारात घेता एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वीकारलेल्या गुंतवणुकीची परतफेड ते करू शकत नसल्याचा निष्कर्ष नोंदवत सेबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्याचे पोलीस आयुक्त अहमद जावेद व सहआयुक्त (आर्थिक गुन्हा अन्वेषण) धनंजय कमलाकर यांनी सांगितले. विविध १५ बँकांतील १९२ खाती गोठविण्यात आल्याचेही कमलाकर यांनी सांगितले.