साहेब, पकडलेले उंदीर सोडायला गेलो होतो; घराबाहेर पडण्यासाठी अजब कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 06:37 AM2021-04-16T06:37:22+5:302021-04-16T06:37:44+5:30
Maharashtra Lockdown : कारवाईदरम्यान एक जण त्याच्या पीळदार मिशा इतरांना दिसाव्यात म्हणून विनामास्क दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी त्यांना थांबवून दंडात्मक कारवाई केली.
औरंगाबाद : संचारबंदी असताना बाहेर पडण्यासाठी कोण कोणती कारणे सांगतील याची कल्पना पोलिसांनाही येऊ शकत नाही. विनाकारण बाहेर पडलेल्या एकाने चक्क पकडलेले उंदीर सोडण्यासाठी घराबाहेर पडल्याचे अजब कारण क्रांती चौक पोलिसांना सांगितले.
त्याचे हे कारण पोलिसांना न पटल्याने त्याला ५०० रुपये दंड करण्यात आला. क्रांती चौक ठाण्याचे फौजदार गायकवाड, हवालदार योगेश नाईक आणि कर्मचारी औरंगपुऱ्यात तैनात होते. यावेळी त्यांनी एका दुचाकीस्वाराला अडवले.
तेव्हा त्याने उंदीर सोडण्यासाठी गेलो होतो, असे अजब कारण पोलिसांना सांगितले. त्याचे हे उत्तर ऐकून पोलीस अचंबित झाले.
घरात खूप उंदीर झाल्यामुळे उंदीर पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. यात दोन उंदीर अडकले होते.
हे उंदीर सोडण्यासाठी गेलो होतो, असे तो म्हणाला. त्याचे उत्तर ऐकून पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.
पीळदार मिशांमुळे मास्क नाही
आजच्या कारवाईदरम्यान एक जण त्याच्या पीळदार मिशा इतरांना दिसाव्यात म्हणून विनामास्क दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी त्यांना थांबवून दंडात्मक कारवाई केली.