साहेब, लग्नासाठी कुणी मुलगी देत नाही, तरुणाचा आमदाराला फोन; उत्तर ऐकलं तर हसाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 10:59 AM2023-01-10T10:59:54+5:302023-01-10T11:00:13+5:30
लग्नासाठी मुलगी मिळत नाही त्यामुळे तरूणानं त्याची व्यथा थेट आमदाराला फोन करून मांडली.
औरंगाबाद - अलीकडेच महाराष्ट्रात काही तरुणांनी नवरदेव मोर्चा काढून लक्ष वेधून घेतले होते. लग्नासाठी मुली देत नाही म्हणून तरुणांनी हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता सोशल मीडियावर महाराष्ट्रातील एका तरुणाची ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात एका तरुणानं थेट आमदाराला फोन करून लग्नासाठी कुणी मुलगी देत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या तरुणाच्या समस्येला आमदारांनी दिलेले उत्तर पाहून तुम्हीही हसाल.
नेमका काय आहे हा संवाद?
तरूण - हॅलो, साहेब जय महाराष्ट्र
आमदार - जय महाराष्ट्र
तरूण - रत्नपूरहून विजय होळकर बोलतोय, ग्रामीणमधून
आमदार - बोला, बोला
तरूण - काय निवांत का?
आमदार - नाही, एकाठिकाणी बसलोय
तरूण - साहेब, असा विषय होता, ८-९ एकर जमीन आहे. घरी चांगली परिस्थिती आहे. पण इथं कुणी मुलगीच द्यायला तयार नाही.
आमदार - कुठं?
तरूण - रत्नपूर, खुलताबाद, भद्रा मारूतीजवळ
आमदार - तुमचा बायोडाटा पाठवून द्या
तरूण - रत्नपूरपासून ६ किमी गाव आहे. परिस्थिती चांगली आहे.
आमदार - बायोडाटा पाठवून द्या.
तरूण - तुमच्या कन्नड सर्कलमध्ये भरपूर मुली आहेत साहेब
आमदार - बरं बरं ठीक आहे, बोलतो
या ऑडिओ क्लीपमधील आमदार उदयसिंह राजपूत असल्याचं बोललं जात आहे. सध्या ही क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोलापूरात तरूणांनी काढला होता अनोखा मोर्चा
राज्यामध्ये दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत चालल्यामुळे तरुण मुलांच्या लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. अनेक तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. मुलांची लग्न न झाल्यामुळे आईबापाची काळजी दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यांना वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. याबाबत सरकारने योग्य धोरण राबवावे या मागणीसाठी अलीकडेच लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक नवरदेवांचा मुंडवळ्या बांधून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, या मागणीसाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेले मुलं लग्नातील नवरदेवासारखी नटली होती. त्याची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या मोर्चात शेकडो अविवाहित मुलं सहभागी झाले होते. या आगळ्या वेगळ्या मोर्चाने सोलापूरकरांचे लक्ष वेधले. या मोर्चाचे नेतृत्व ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक रमेश बारस्कर यांनी केले होते.