साहेब, इंग्लिशमध्ये समजले, का मराठीत सांगू? शेतकऱ्याचा नादच खुळा, दिली अतिवृष्टी नुकसानीची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 06:21 AM2022-08-03T06:21:25+5:302022-08-03T06:21:53+5:30
दिल्लीच्या पथकाला शेतकऱ्याने चक्क इंग्रजी, हिंदी, मराठीत दिली अतिवृष्टी नुकसानीची माहिती
- महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या चार सदस्यीय केंद्रीय पथकाला मोडक्यातोडक्या इंग्रजी भाषेत माहिती देणाऱ्या शेतकऱ्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आधी इंग्लिशमधून, नंतर हिंदीतून बोलल्यानंतर त्यांना सरतेशेवटी मायमराठीचा आधार घ्यावा लागल्याचे या व्हिडीओत दिसते. शेतकऱ्याच्या या अनोख्या संवाद शैलीमुळे पथकातील सदस्यही बुचकळ्यात पडले होते.
नुकसान पाहणीसाठी पथक मंगळवारी सकाळी बोरगाव (ता. देवळी) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर आले. वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यादेखील पथकासोबत होत्या. शेतकरी व्यथा सांगायला पोहोचले. माजी सरपंच प्रशांत निमसडकर यांचेही नुकसान झाले आहे. सध्या त्यांच्या पत्नी बोरगावच्या सरपंच आहेत. अधिकारी दिल्लीचे आहेत म्हटल्यावर त्यांना मराठी कदाचित कळणार नाही, असे वाटल्याने की काय, प्रशांत निमसडकर यांनी थेट इंग्रजीत अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सुरुवात केली. नदीला पूर कसा आला, पाणी शेतात कसे घुसले याबद्दल ते मोडक्या-तोडक्या इंग्रजीत सांगायला लागले. एक अधिकारी चुळबूळ करायला लागल्यावर मग त्यांनी ‘ट्रॅक’ बदलत हिंदीचा आधार घेतला. दोन-चार वाक्य झाल्यावर मग त्यांना मायमराठीचा आधार घ्यावा लागला.
‘लॉस ऑफ लाइफ’ टाळण्यात यश
सततच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. याच पूरस्थितीदरम्यान ॲक्टिव्ह मोडवर आलेल्या तालुका व जिल्हा प्रशासनाला दक्ष नागरिकांच्या सहकार्यामुळेच ‘लॉस ऑफ लाइफ’ टाळण्यात यश असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
चक्करच येते हो साहेब...
यशोदा नदीचे बॅक वॉटर अनेकांच्या शेतात शिरले. काहींच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठी नासाडी झाली. अंकुरलेले पिके पाण्याखाली आली, तर काही ठिकाणी पिके वाहून गेली. १९९४ मध्ये पूरस्थितीचे संकट ओढावले होते; तेव्हाच्या संकटापेक्षा यंदा मोठे नुकसान झाले आहे. शेतातील विदारक परिस्थिती पाहून चक्करच येते हो साहेब. तुम्ही तरी आपल्या अहवालात नुकसानीची वास्तव स्थिती मांडा, असे साकडे निमसडकर यांनी अधिकाऱ्यांना घातले.