नेरुळमधील संत गाडगेबाबा उद्यानावर पालिकेची अवकृपा
By admin | Published: June 8, 2017 02:40 AM2017-06-08T02:40:52+5:302017-06-08T02:40:52+5:30
सहा वर्षांमध्ये ११ लाख १२ हजार नागरिकांनी भेट दिलेल्या नेरूळमधील संत गाडगेबाबा उद्यानावर महापालिकेची अवकृपा सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सहा वर्षांमध्ये ११ लाख १२ हजार नागरिकांनी भेट दिलेल्या नेरूळमधील संत गाडगेबाबा उद्यानावर महापालिकेची अवकृपा सुरू आहे. विद्युत व्यवस्था पूर्ववत करण्यात कंजुषी केली जात आहे. येथील कृत्रिम धबधबा व पाच ठिकाणच्या फाऊंटनची मोटार बिघडली असून ती दुरुस्त केली जात नाही. गाडगेबाबांचा पुतळा अंधारात असून लहान मुलांसाठीची टॉय ट्रेनही बंद असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे तीन पुरस्कार मिळाले असून, १ कोटी ५ लाख रुपये बक्षीस मिळाले होते. या पैशामधून आयुक्त निवासाच्या मागील बाजूला रॉक गार्डन विकसित करण्यात येवून त्याला संत गाडगेबाबांचे नाव देण्यात आले. येथे लहान मुलांसाठी २ रुपये व प्रौढ नागरिकांसाठी फक्त ५ रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याने वंडर्स पार्कपेक्षा येथे नागरिक गर्दी करत असतात. जानेवारी २०११ मध्ये उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले असून आतापर्यंत ८ लाख ५० हजार ८०३ प्रौढ नागरिक व २ लाख ६१ हजार ७८५ लहान मुलांनी उद्यानाला भेट दिली आहे. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यामुळे रोज दीड ते दोन हजार नागरिक उद्यानाला भेट देत आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून येथील ५० टक्के पथदिवे बंद आहेत. उद्यानामध्ये पाच ठिकाणी फाऊंटनची व्यवस्था केली आहे. एका ठिकाणी कृत्रिम धबधबा तयार केला असून तेथील पाणी उपसा करणाऱ्या मोटारी नादुरुस्त झाल्या आहेत. वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्या दुरुस्त केल्या जात नाहीत. संत गाडगेबाबांचा पुतळाही अंधारात असून प्रशासन काहीही कार्यवाही करत नाही.
उद्यानामधील टॉय ट्रेनही अनेक महिन्यांपासून बंद आहे. वास्तविक सहा वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या टॉय ट्रेनची वॉरंटी संपली आहे. वारंवार नादुरुस्त होत आहे. नवीन टॉय ट्रेन विकत घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. कॅफेटेरीया सुरू करण्यात आलेला नाही. शहरातील महत्त्वाच्या उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे आयुक्त याच ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. आयुक्त निवासाला लागून असलेल्या उद्यानाची दुरवस्था थांबविता येत नसेल तर इतर ठिकाणच्या उद्यानांची देखभाल कशी केली जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पालिकेकडे कर्मचारीही नाहीत
संत गाडगेबाबा उद्यानामध्ये तिकीट वसुलीसाठी व तीनही आवक, जावक गेटवर पालिकेचे कर्मचारी उपस्थित नसतात. सुरक्षा रक्षकांवर सर्व जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांना सुरक्षेऐवजी इतरच कामे करावी लागत असून भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.