बहिणीच्या बिदाईपूर्वीच भाऊ सरणावर
By admin | Published: May 19, 2017 07:15 PM2017-05-19T19:15:45+5:302017-05-19T19:15:45+5:30
बहिणीचे लग्न जुळले, हुंडाही ठरला, पत्रिकाही छापल्या; परंतु लग्नाचा खर्च काही पेलवेना
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 19 - बहिणीचे लग्न जुळले, हुंडाही ठरला, पत्रिकाही छापल्या; परंतु लग्नाचा खर्च काही पेलवेना. त्यामुळे निराश झालेल्या भावाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदलगावात घडली. बहिणीची बिदाई करण्यापूर्वीच भाऊ सरणावर गेल्याच्या या हृदयद्रावक घटनेने तालुका सुन्न झाला आहे. या घटनेने हुंड्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवनाथ बाबासाहेब गावडे (१९, रा. नांदलगाव) असे मयताचे नाव आहे. बाबासाहेब गावडे यांना तीन मुली, दोन मुले. गाठीशी असलेल्या चार एकर शेतीत राबून हे कुटुंब उदरनिर्वाह भागवते. त्यांच्या दोन मुलींचे विवाह झाले असून, तिसरीही उपवर झाल्याने तिच्यासाठी वर शोधण्यात आला. आधीच दोन मुलींच्या लग्नावर बाबासाहेब गावडेंचा लाखोंचा खर्च झाला होता. त्यात तिसऱ्या मुलीचे लग्न जुळल्यामुळे त्यांनी पैशांची जुळवाजुळव सुरु केली. ३१ मे रोजी लग्नमुहूर्त ठरला होता. त्यापूर्वी हुंडा, बस्ता, संसारोपयोगी साहित्य, मंडप, जेवण आदी खर्चासाठी त्यांना लाखो रुपयांची गरज होती. त्यांच्यावर आधीच कर्जाचा डोंगर असल्याने कर्ज देण्यास कोणी धजावत नव्हते. नातेवाईक, मित्र परिवारानेही आखडता हात घेतला, बँक दारात उभे करीना त्यामुळे बाबासाहेब बेचैन झाले होते. त्यांचा मुलगा नवनाथही चिंताग्रस्त होता. वधू- वर पक्षाकडील मंडळींनी लग्नाची जोरात तयारी केली; परंतु पैशांची तरतूद होत नसल्याने बाबासाहेब यांचा थोरला मुलगा नवनाथ गावडे याने स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तलवाडा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकामी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शोकाकूल वातावरणात शुक्रवारी नवनाथवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तलवाडा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
बाबासाहेब गावडे यांच्या तिसऱ्या मुलीसाठी लाखो रुपयांचा हुंडा देण्याचे निश्चित झाले होते. ३१ मे रोजी विवाह सोहळा असल्याने त्यापूर्वीच हुंडा द्यायचा होता. मात्र, लग्नखर्चासोबतच हुंड्याची रक्कम जुळविणे गावडे कुटुंबियांना मुश्किल बनले होते. त्यामुळे नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या नवनाथने टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे लग्नघरच्या आनंदावर दु:खाचे विघ्न पडले आहे.