बहिणीची माया, चार वर्षाच्या चिमुकलीने वाचविले भावाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 08:22 PM2018-01-21T20:22:32+5:302018-01-21T20:22:56+5:30

बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर असते. पण भावाच्या रक्षणासाठी बहीणही धावून आल्याच्या घटना समाजात अनेकदा घडत असतात. वसगडे (ता. पलूस) येथे रविवारी याचा प्रत्यय गावकºयांना आला. अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे तिच्या दोन वर्षाच्या भावाचे प्राण वाचले.

Sister's maya, the life of the brother who survived the four-year-old chimukli | बहिणीची माया, चार वर्षाच्या चिमुकलीने वाचविले भावाचे प्राण

बहिणीची माया, चार वर्षाच्या चिमुकलीने वाचविले भावाचे प्राण

googlenewsNext

 

सांगली - बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर असते. पण भावाच्या रक्षणासाठी बहीणही धावून आल्याच्या घटना समाजात अनेकदा घडत असतात. वसगडे (ता. पलूस) येथे रविवारी याचा प्रत्यय गावकºयांना आला. अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे तिच्या दोन वर्षाच्या भावाचे प्राण वाचले. इतक्या लहान वयात आलेली सतर्कता, समज आणि त्याला मिळालेली धाडसाची जोड यामुळे या चिमुकलीचे कौतुक गावक-यांमध्ये सुरू आहे. 
वसगडे येथील सुनील शिरोटे कुटुंबीय तसे मध्यमवर्गीय. आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुले, असे छोटेसे कुटुंब. सुनीलला स्नेहल ही चार वर्षाची मुलगी, तर सुजल हा दोन वर्षाचा मुलगा आहे. रविवारी सकाळी आठ वाजता हे संपूर्ण कुटूंब कामात व्यस्त होते. सुनीलची शेताकडे जाण्यासाठी धावाधाव सुरू होती, तर घरात स्नेहल व सुजल हे दोघेही खेळत होते. थोड्या वेळात ती दोघेही घराबाहेरील अंगणात खेळण्यासाठी गेली. अंगणाच्या बाहेरील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहाजवळ स्नेहल बसली होती, तर सुजल खेळत खेळत अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ गेला. पाचशे लिटरची ही टाकी होती. त्यात जवळपास चारशे लिटर पाणी होते. टाकीच्या कट्ट्यावर उभे राहून तो पाण्याने भरलेल्या पाण्याच्या टाकीत पाहू लागला. हे त्याच्या बहिणीने पाहिले आणि या चार वर्षाच्या चिमुरडीला पुढील धोका कळला. ती धावतच त्याच्याकडे आली. पण तोपर्यंत सुजलचा तोल पाण्याच्या दिशेने गेला होता. भाऊ पाण्याच्या टाकीत पडत असतानाच, स्नेहलने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या हाती त्याचा एक पाय सापडला. पण सुजलचे तोंड पाण्यातच बुडाले होते. तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याचा श्वास गुदमरत होता.

हे पाहून स्नेहल जिवाच्या आकांताने ओरडली. तिचा आवाज ऐकून घरातील मोठी माणसे बाहेर धावत आली. समोरचे दृश्य पाहून त्यांच्या अंगावर शहारे आले. तात्काळ त्यांनी सुजलला पाण्यातून बाहेर काढले. त्याच्या पोटात पाणी गेले होते. त्याला उलटे झोपवून पाठ थोपटून पोटातील पाणी बाहेर काढले आणि  सुजलचे प्राण वाचले. अशा रितीने शिरोटे कुटुंबियांवर आलेले दु:खाचे संकट त्यांच्या चार वर्षाच्या चिमुकलीच्या प्रसंगावधानाने टळले. मुलीच्या या धाडसाने तिच्या बापाच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या होत्या. सुनीलने मुलीला छातीशी कवटाळले. तोपर्यंत आजुबाजूच्या शेजा-यांनी गर्दी केली होती. 

गावात कौतुकाचा विषय
स्नेहलचे वय अत्यंत कमी आहे. इतक्या लहान वयात मुलांना फारशी समज नसते. तरीही स्नेहलने दाखविलेली सतर्कता, तत्परता, धाडस आणि बुद्धिकौशल्य थक्क करणारे होते. मोठ्या माणसांनाही अशा प्रसंगात ब-याचदा काही सूचत नाही. त्यामुळे दुर्दैवी घटना टाळता येत असतानाही टळत नाहीत. अशा परिस्थितीत स्नेहलचे हे धाडस सा-यांच्याच कौतुकाचा विषय बनला आहे. गावक-यांमधून तिच्या या धाडसाची चर्चा दिवसभर सुरू होती.

Web Title: Sister's maya, the life of the brother who survived the four-year-old chimukli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.