‘लाडक्या बहिणीं’ना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच! आचारसंहितेमुळे निधी तूर्तास थांबविला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 01:42 PM2024-10-20T13:42:31+5:302024-10-20T13:48:05+5:30
डिसेंबरपासून योजनेचे पैसे पुन्हा मिळणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे तूर्तास थांबवण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना तत्काळ थांबविण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या होत्या. त्यानुसार मुख्य सचिवांनी सर्व विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहून अशा योजना थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने ही योजना थांबविण्याचा निर्णय घेतला.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी आचारसंहितेनुसार राज्यातील आर्थिक लाभाच्या योजनांचा आढावा घेतला. त्यानुसार महिला व बालविकास विभागातर्फे सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही त्यांनी आढावा घेतला. मात्र, या योजनेच्या निधी वितरणाचे काम यापूर्वीच थांबविल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने आयोगाला दिली.
निम्म्या महिलांना मिळाले योजनेचे पैसे
महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये २ कोटी ३४ लाख महिलांच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा झाले. राज्यात महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख आहे. म्हणजे एकूण महिला मतदारांपैकी पन्नास टक्के महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता देता येणार नाही, ही बाब लक्षात घेऊनच सरकारने आगाऊ हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला आहे.
२ महिन्यांचे ३ हजार जमा
योजनेची अंमलबजावणी थांबविण्यात आली असली तरी मतदानाच्या आधीच लाभार्थींना नोव्हेंबरपर्यंतचे पैसे मिळतील याची काळजी सरकारने घेतली होती. त्यानुसार ऑक्टोबरचा लाभ देताना नोव्हेंबरचा हप्ताही सरकारने आगाऊ दिला. त्यामुळे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये याच महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मिळाले आहेत.
आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीला ब्रेक लावण्याचा प्रश्नच नाही. आम्ही नोव्हेंबरचे पैसे ॲाक्टोबरमध्येच दिले. योजनेवर आम्ही जो निर्णय घेतला तो निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घेतला नाही. बहीणींना कायमस्वरुपी पैसे मिळावे ही भावना ठेवून हा निर्णय घेतला. म्हणून ॲाक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचे पैसे दिले.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री