कऱ्हाडात भावंडांची आत्महत्या
By admin | Published: April 5, 2017 05:57 AM2017-04-05T05:57:57+5:302017-04-05T05:57:57+5:30
दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कऱ्हाड ( जि. सातारा) : कर्जाच्या वाढत्या बोजामुळे आत्महत्या केलेल्या दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी बँकांनी लावलेल्या तगाद्यामुळेच दोघांनी आत्महत्या केली असून कुटुंबावरील बँकांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांनी केली. पोलिसांनी त्यांची समजूत घालून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले.
जगन्नाथ कृष्णा चव्हाण (४०) आणि लहान भाऊ विजय (३३, रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत. कर्जाला कंटाळून विजयने विष प्राशन केल्यानंतर जगन्नाथने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. विद्यानगर व टेंभू येथे सोमवारी रात्री तासाच्या फरकात या दोन घटना घटल्या. या दोघांवर बँकांचे साठ लाखांहून अधिक कर्ज असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली.
दोघांनी काही वर्षांपूर्वी दोन बँकांकडून कर्ज घेतले. ओगलेवाडी येथे कृषी सेवा केंद्र नावाचे दुकान सुरू केले. तसेच चार वर्षांपूर्वी सरकी पेंड तयार करण्याची जे. पी. अॅग्रो प्रोडक्टस् नावाची कंपनी त्यांनी कडेगाव (जि.सांगली) येथील औद्योगिक वसाहतीत सुरू केली. सुरुवातीला त्यांनी त्या कर्जाच्या रकमेची वेळेत परतफेड केली. मात्र, कालांतराने व्यवसाय डबघाईस आला. परिणामी, हे दोन्ही बंधू कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. बँकांनी वसुलीसाठी त्यांना नोटीसाही पाठविल्या होत्या. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. त्यातूनच आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. (प्रतिनिधी)