टँकरच्या टपावर बसून ‘स्कूल चलें हम’

By admin | Published: October 19, 2016 01:19 AM2016-10-19T01:19:32+5:302016-10-19T01:19:32+5:30

शिक्षणाची आस तर स्वस्थ बसू देत नाही... पण शाळेत जाण्यासाठी चांगल्या सुविधा नाहीत.

Sit down on the tanker 'Let us go school' | टँकरच्या टपावर बसून ‘स्कूल चलें हम’

टँकरच्या टपावर बसून ‘स्कूल चलें हम’

Next

शंकर कोरटकर,

लोणी देवकर- शिक्षणाची आस तर स्वस्थ बसू देत नाही... पण शाळेत जाण्यासाठी चांगल्या सुविधा नाहीत. अशा वेळी विद्यार्थ्यांना जीवाची पर्वा न करता चक्क टँकरच्या टपावर बसून प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. लोणी देवकर या गावातील विद्यार्थ्यांवर ही दुर्दैवी वेळ आलेली आहे.
शटल बसच्या कमी फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांवर येत असल्याचे कारण सध्या पुढे येत आहे. हात केला तरी न थांबणाऱ्या बस, तर शटल बसच्या कमी असणाऱ्या फेऱ्या, यामुळे पुणे-सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या गावांमधील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी चक्क टँकर वा ट्रकच्या टपावर बसून धोकादायक पद्धतीने प्रवास करीत आहेत. त्यामुळे या भागात ताताडीने शटल बसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी पालकवर्गातून केली जात आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो लांबपल्ल्याच्या बस धावतात. या बस महामार्गावरील मोठ्या गावांमध्येच थांबा घेतात. तसेच या बसला शालेय विद्यार्थ्यांसाठी असणारा पासदेखील चालत नसल्याचे वाहक सांगतात. तसेच स्थानिक शटल बसच्या फेऱ्या कमी असल्यामुळे पळसदेव, लोणी देवकर, भिगवण आदी भागांत शिक्षणासाठी जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने ट्रक, टँकरच्या टपावर बसून प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थिनींनाही दररोज असा प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न
उपस्थित झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे महामार्ग पोलीस अथवा स्थानिक पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
>भलते धाडस करू नये
टँकरवर बसून प्रवास करताना हा धोकादायक प्रवास जीवावर देखील बेतू शकतो. टँकरचालकांनीही विद्यार्थ्यांना घेण्याचे असे भलते धाडस करू नये. तसेच शिक्षण घेणे सोपे व्हावे, त्यासाठी जीव धोक्यात घालावा लागू नये यासाठी विद्यार्थ्यांसाठी बस फेऱ्या तातडीने वाढवणे गरजेचे आहे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
>अपघात व्हायची वाट पाहताय का ?
महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. आम्ही आमच्या मुला-मुलींना शिकवायचे का नाही, एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे तातडीने इंदापूर आगाराने या भागात शटल बसच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Sit down on the tanker 'Let us go school'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.