कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकरी मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:57 AM2017-10-11T04:57:10+5:302017-10-11T04:57:26+5:30
यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अलीकडे कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासन विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी
विशेष प्रतिनिधी
मुंबई : यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अलीकडे कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासन विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. आतापर्यंत २८ शेतक-यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह (कलम ३०४) गुन्हे दाखल करण्यात येतील. विशेषत: अप्रमाणित कीटकनाशकांच्या उत्पादकांविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अप्रमाणित कीटकनाशकांची सर्रास विक्री करणाºया विक्रेत्यांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात येतील. शेतकरी मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या कोणत्याही व्यक्ती वा कंपनीला पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
कीटकनाशकांमुळे आतापर्यंत झालेल्या २८ शेतकरी मृत्यूंपैकी यवतमाळ जिल्ह्यातील २०,
नागपूर ५, अकोला २ आणि बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकºयाचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी
सांगितले.