सीताफळांनी दिला आदिवासींना आधार
By admin | Published: October 31, 2016 05:16 AM2016-10-31T05:16:48+5:302016-10-31T05:16:48+5:30
थंडीचा कडाखा वाढला असून सीताफळांच्या विक्री व्यावसायाला बरकत आली आहे.
अकोले (अहमदनगर) : थंडीचा कडाखा वाढला असून सीताफळांच्या विक्री व्यावसायाला बरकत आली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये २० किलोच्या कॅरेटला ७०० ते ८०० रुपये, तर स्थानिक बाजारपेठेत प्रति किलो ३५ ते ४० रुपये भाव मिळत असल्याने आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद द्विगुणीत होताना दिसत आहे.
गर्दणी (ता. अकोले) हे सीताफळाचे आगार म्हणून ओळखले जाते. येथे सीताफळाचा बाजार भरतो. बाहेरगावचे व्यापारी येऊन सीताफळांची खरेदी करतात. तालुक्यात गर्दणीप्रमाणेच विठा, रुंभोडी, बहिरवाडी, शेरणखेल, टाकळी, ढोकरी, आंबड, पाडाळणे या भागात सीताफळांच्या झाडांची संख्या चांगली असून अकोले, राजूर, कोतूळ व गर्दणी बाजारात ही सीताफळे विक्रीला येतात. यंदा पाऊस चांगला झाला असून सीताफळाला पोषक वातावरण मिळाल्याने उत्पादनही जास्त झाले आहे.
विठे घाटात रस्त्याच्या कडेला आदिवासी सीताफळांच्या पाट्या घेऊन विक्रीला बसू लागले आहेत. भंडारदरा परिसरात भटकंतीसाठी येणारे पर्यटक येथे मुद्दामहून थांबून सीताफळांची खरेदी करताना पहायला मिळत आहे.
शाळेला सुट्टी असल्याने शाळकरी मुले रानातून सीताफळे तोडून आणतात आणि विक्रीसाठी घाटरस्त्याच्या कडेला बसतात. सीताफळांच्या विक्रीतून त्यांची दिवाळी साजरी होते. (प्रतिनिधी)