वरातीमधील घोडयाची लाथ बसून तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:04 PM2019-05-30T12:04:25+5:302019-05-30T12:06:54+5:30
माढा तालुक्यातील अंजनगांव खेलोबा येथील घटना
माढा : माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे लग्नाच्या वरातीमधील घोडा बिथरल्याने घोड्याने मालकाच्या हाताला हिसका देऊन तरूणाला जोरदार धडक दिली. या धडकेत तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला. अनिल गुंडीबा गायकवाड (वय ४४) असे धडकेत मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
अनिल गायकवाड हा गावातील किसन त्रिंबक वाघमाडे यांचा मुलगा नामदेव याचा विवाह २९ मे रोजी दुपारी तीन वाजता होता. नवरदेवाची वरात गावामध्ये आली व नवरदेव ग्रामदैवताच्या दर्शनाला मंदिरात गेल्यावर बँडच्या तालावर घोडा नाचवत असताना उन्हाचे तापमान वाढले होते. त्यातच अचानक घोडा बिथरला मालकाच्या हातातून निसटून अनिल गायकवाड यांना घोड्याने धडक दिली़ घोड्याची लाथा लागल्याने जबर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी सोलापूरला दवाखान्यात पाठविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. मागील काळात त्याच्या रिक्षामध्ये राहिलेली पैशाची बॅग त्याने परत केली होती, त्यामुळे त्याचा प्रामाणिक रिक्षावाला म्हणून परिसरात ओळख देखील निर्माण झाली होती. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई-वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे.