गरिबांचे हाल कायम; राज्याचा पैसा गेला कुठे?
By admin | Published: June 7, 2014 10:00 PM2014-06-07T22:00:19+5:302014-06-08T00:09:45+5:30
वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला खडसे यांनी आज सुरुवात केली.
गरिबांचे हाल कायम; राज्याचा पैसा गेला कुठे?
-खडसे यांचा सवाल
मुंबई - आदिवासी, शेतकरी, मागासवर्गीयांची दुरावस्था तशीच कायम आहे मग राज्याचे उत्पन्न, कर्जाऊ घेतलेली अब्जावधीची रक्कम जिरली कुठे, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केला.
वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला खडसे यांनी आज सुरुवात केली. राज्य कर्जावरील व्याजापोटी दर महिन्याला ३ हजार कोटी रुपये भरत आहे. अब्जावधी रुये खर्चून नेमके किती सिंचन झाले याची माहिती राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिली जात नाही. सिंचनात गैरव्यवहार झाल्याचे मान्य करणारे मुख्यमंत्री राजकीय गरज म्हणून राष्ट्रवादीच्या शेजारी बसतात, अशी टीका त्यांनी केली.
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटलांनी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. सीसीटीव्ही बसवू, फोर्स वन निर्माण करु, सागरी सुविधा बळकट करु, पोलिस भरती करु, बुलेटप्रुफ जॅकेट घेऊ. एकाचाही उल्लेख या अर्थसंकल्पात दिसला नाही. आबांच्या घोषणांचे काय झाले? राज्यात दलित, महिला कुणीही सुरक्षित नाही, असे ते म्हणाले. राज्यावरील संकट दूर करण्यासाठी आकस्मिक निधी असतो पण सरकार तो स्मारके, मंत्र्यांच्या गाड्या अन् बंगल्यांवर खर्च करीत असल्याचेही ते म्हणाले.
अर्थसंकल्पावरील चर्चेत सुभाष देसाई, गणपतराव देशमुख, मीनाक्षी पाटील, अनिल बोंडे, अबू आझमी, सुरेश हळवणकर, अमीन पटेल, प्रवीण दरेकर, रवींद्र वायकर आदी सदस्यांनी भाग घेतला.(विशेष प्रतिनिधी)
फुटाणे खाण्याची वेळ येईल
महागाई कमी करण्याचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्यांना मदत दिलेली नाही. आणि तंबाखू, चुरमुरे, फुटाणे यासारख्या वस्तूंवर करमुक्ती दिली. खा तंबाखू, लावा चूना. पण आता तुमच्यावरच फुटाणे खाण्याची वेळ हीच जनता आणेल. राज्य चार महिन्यांत भारनियमनमुक्त करण्याच्या १५ वर्षांपूर्वीच्या घोषणेचे काय झाले? दादा क्या हुआ तेरा वादा, असे बोल खडसे यांनी सुनावले.