आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची परिस्थिती हलाखीचीच

By Admin | Published: September 16, 2016 01:54 AM2016-09-16T01:54:00+5:302016-09-16T01:54:00+5:30

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबायला तयार नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाची स्थिती आणखीच बिकट झालेली आहे.

The situation of the suicidal farmer families is just a matter of concern | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची परिस्थिती हलाखीचीच

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची परिस्थिती हलाखीचीच

googlenewsNext

वर्धा : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबायला तयार नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाची स्थिती आणखीच बिकट झालेली आहे. शासकीय मदतीतूनही ही कुटुंबे सावरलेली नसून अत्यंत दैनावस्थेत जीवन जगत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या पाहणीत पुढे आली आहे.
देवळी तालुक्यातील सर्वच गावे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत. ईसापूर येथील संजय रामराव आंबटकर या तरुण शेतकऱ्याने बँकेच्या कर्जाचा धसका घेऊन आत्महत्या केली. वडिलोपार्जित एक हेक्टर शेती आहे. शिक्षण घेणारी दोन लहान मुले व बारावी उत्तीर्ण पत्नी असा त्यांचा घरसंसार. पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा भार संजयच्या पत्नीच्या खांद्यावर आला. दुसऱ्याच्या मदतीने ती शेती करते आणि शेतमजुरी करून मुलांचा सांभाळ करण्याचा कसाबसा प्रयत्न करीत आहे. पतीने कर्ज घेऊन घर बांधले. मात्र ते अर्धवट स्थितीत आहे.
देवळीत मागील दोन वर्षात विजय मंगरूळकर, दिलीप सावरकर, विठ्ठलराव तायवाडे, संदीप खोंड, दिनेश घोडे, चंपत पांडे या सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विद्यमान स्थितीत ही कुटुंबे डबघाईस आली आहेत. नांदोरा (डफरे) येथे सुलोचना गणेश बाणकर व लता बबन कन्नाके या दोन शेतकरी महिलांनी आत्महत्या केल्या. घरात अन्नाचा दाणा नाही. मुलांच्या शैक्षणिक गरजा दूरच, पण यामुळे कुटुंब प्रमुखाची होणारी विवंचना पाहू न शकल्याने या शेतकरी पत्नींनी मृत्यूला कवटाळले.
डिगडोह येथील द्रोपदा लक्ष्मण कुबडे या महिलेनेसुद्धा याच विवंचनेतून आत्महत्या केली. विजयगोपाल येथे २ डिसेंबर २००२ ला मारोती महादेवराव ढांगे यांनी विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळाली, परंतु ती तोकडी ठरली. त्यांच्या पत्नीला अंगणवाडीत मदतनीस म्हणून कामावर घेण्यात आले. त्यांची परिस्थिती जेमतेम आहे. प्रशांत वासुदेवराव चौधरी यांनीसुद्धा कर्जापोटी आत्महत्या केली होती. त्यांचा भाऊ शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.
आष्टी तालुक्यात ३ जुलै २००४ रोजी प्रभाकर शामराव खटाळे (२८) नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यावेळी मंत्र्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी भेटी दिल्या. शासकीय एक लाख रुपयाची मदत तोकडी ठरली. प्रभाकरच्या आत्महत्येने कुटुंब उपेक्षित जीणे जगत आहे. दोन वेळच्या जेवणासाठी कुटुंबाला काबाडकष्ट करावे लागत आहे. त्याच्या पश्चात अपंग भाऊ अरुण आहे. अरुणची पत्नी सुनंदा, मुलगी आचल, मुलगा चेतन हे सगळेजण पाच एकर शेतीमध्ये दिवसभर कष्ट करतात. झोपडीवजा घर आहे. शेती पिकत नसल्याने त्यांची विवंचना वाढत आहे.
आष्टी येथील रवी अशोक लाड (२५) या तरुण शेतकऱ्याने १२ डिसेंबर २०१५ २२ला कर्जाच्या ओझ्यापायी आत्महत्या केली. वडिलांचे आधीच निधन झाल्याने रवी हाच कुटुंबाचा आधार होता. त्याने आपली जबाबदारी पेलवत पाच बहिणींचे लग्न केले. मात्र शेतात सततची नापिकी असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँक तथा सावकाराचे कर्ज वाढत गेले. शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून एक लक्ष रुपये मदत केली. घरी चार एकर शेती आहे. सिंचनाची सोय नाही. खरीपाच्या हंगामावर शेती अवलंबून आहे. रवीच्या आत्महत्येनंतर त्याची आई सुलोचना लाड या मुलाच्या धक्क्यातून सावरलेल्या नाही. शेती ठेक्याने देऊन कसाबसा ही माऊली आपला उदरनिर्वाह करीत आहे.
वर्धा तालुक्यातील पवनार येथे कुटुंब आणि शेतीची जबाबदारी पार पाडणाऱ्या मंदा हिवरे या शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली आहे. पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रसंगी स्वत: राबून मंदाताई शेती करायच्या. मंदाताईच्या रूपाने हिवरे कुटुंबाचा आधारच हिरावला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरातील स्थिती बिकट असल्याचीच बाब पुढे आली आहे.
आर्वी तालुक्यातील खुबगाव येथील विलास नानाजी राऊत या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांची पत्नी व दोन मुले असा परिवार मागे आहे. सात एकर शेती असताना पीठगिरणीवर त्यांच्या कुटुंबाचा गाडा पुढे कसाबसा ढकलत आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ हिरावल्यानंतर प्रत्येक कुटुंबाची दैना झाल्याचे एकंदर चित्र वर्धा जिल्ह्यात बघायला मिळाले.

Web Title: The situation of the suicidal farmer families is just a matter of concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.