गोव्यात शिवेसेनेची राज्य कार्यकारिणी बरखास्त
By admin | Published: May 7, 2016 08:42 PM2016-05-07T20:42:45+5:302016-05-07T20:42:45+5:30
शिवसेना राज्य कार्यकारिणी बरखास्त केली असून पुढील नेमणुका होईर्पयत राज्यप्रमुखांसह सर्व पदांना स्थगिती दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
पणजी, दि. 08 : शिवसेना राज्य कार्यकारिणी बरखास्त केली असून पुढील नेमणुका होईर्पयत राज्यप्रमुखांसह सर्व पदांना स्थगिती दिली आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी हा आदेश काढला आहे.
दुपारी हा आदेश वर्तमानपत्रांच्या कार्यालयात धडकला तरी राज्यप्रमुख अजितसिंह राणो यांना त्याची कोणतीही कल्पना नव्हती. ते म्हणाले की, आपली राज्यप्रमुखपदी नियुक्ती सेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्याकडून अजून कोणतेही निर्देश आलेले नाहीत. राऊत यांनी उध्दवजींच्या सूचनेवरुन जर हा आदेश काढला असेल तर त्याचे मी स्वागत करतो. राज्यात शिवसेनेचे काम वाढविण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. अलीकडेच कामगारदिनी आझाद मैदानावर मोठी सभा घेतली त्या सभेला दोन हजार लोक उपस्थित होते. बार्देस तालुक्यात शिवसेनेचे काम जोमाने सुरू केले होते, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदाच झाला असता.
संपर्कप्रमुखांशी संघर्षाचा परिणाम?
मिळालेल्या माहितीनुसार सेनेचे गोवा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्याशी अजितसिंह यांचे बिनसले होते. राज्य कार्यकारिणीवर बोरकर यांनी आपल्या मर्जीतील माणसे नेमली होती ती अजितसिंह यांना मान्य नव्हती, त्यामुळे संघर्ष सुरु झाला. शिवजयंतीदिनी अजितसिंह यांनी ‘मिशन बार्देस’ची घोषणा केली होती, तीही पक्षातील काही नेत्यांना रुचली नाही.
यांना जावे लागले घरी
राज्य कार्यकरिणीच बरखास्त केल्याने उपराज्यप्रमुख सुदेश भिसे, दक्षिण जिल्हाप्रमुख बाबुराव नाईक, उत्तर जिल्हाप्रमुख आनंद शिरगांवकर तसेच कार्यकारिणीवरील इतरांना घरी जावे लागले आहे.