सहा आरोपींचा जामीन फेटाळला
By admin | Published: April 29, 2016 03:55 AM2016-04-29T03:55:08+5:302016-04-29T03:55:08+5:30
सहाही आरोपींचा जामीन अर्ज माणगांव येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील गाजलेल्या पाली दरोडा प्रकरणातील विनोद विष्णू गुडेकर, भगवान महाडिक, आदित्य भुजबळ, स्वप्निल अरणे, अजित शिंदे आणि दीपक महाडिक सहाही आरोपींचा जामीन अर्ज माणगांव येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला आहे. या सहाही आरोपींनी आपले स्वतंत्र जामीन अर्ज माणगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील अॅड. विलास नाईक यांनी दिली आहे.
पालीत १५ मार्च २०१६ रोजी संध्याकाळी स्वस्तात सोने देतो असे आमिष दाखवून गुन्ह्याचा कट रचून पायरीची वाडी येथील दळवी फार्म हाऊस येथे स्थानिक व्यापारी रमेश परमार, ललित ओसवाल, स्वप्निल परमार, कमलेश जैन व संदीप परमार यांना बोलावून त्यांच्याकडील सोने खरेदीकरिता आणलेली १ कोटी १४ लाख रूपयांची रोख रक्कम व सोन्याची चेन, घड्याळ व मोबाइल आदि दरोडा टाकून लुटण्यात आले होते.
एखाद्या चित्रपटात शोभेल अशी गुन्ह्याची रचना आरोपी गुडेकर, संतोष महाडिक, भगवान महाडिक यांनी रचली होती. त्याकरिता विनोद गुडेकर व त्याचे साथीदारांना पुण्याहून आणून फार्महाऊसजवळ लपवून ठेवले होते. सोन्याचे आमिष दाखवून रक्कम लुटून आरोपी परागंदा झाले होते. रायगड पोलिसांनी लुुटीच्या रकमेपोटी १ कोटी आरोपी रमेश महाडिक व भगवान महाडिक यांच्याकडून जप्त केले होते. दरोड्याच्या ठिकाणी व इंडिका कारमध्ये २ लाख रूपये मिळाले होते तसेच विनोद गुडेकर याच्याकडून ८ हजार रूपये जप्त केले होते. लुटीतील ५२ ग्रॅम सोन्याची चेन व रॅडो कंपनीचे घड्याळ सुद्धा जप्त केले होते.