सुरेखा भोसलेंसह सहा उमेदवारांचे अर्ज दाखल
By admin | Published: January 31, 2017 07:43 PM2017-01-31T19:43:55+5:302017-01-31T19:43:55+5:30
महापालिका निवडणुकीसाठी पूर्व विभागात मंगळवारी (दि.३१) सहा उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
इंदिरानगर : महापालिका निवडणुकीसाठी पूर्व विभागात मंगळवारी (दि.३१) सहा उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. त्यामध्ये मनसेच्या नगरसेवक व सभागृहनेत्या सुरेखा भोसले यांच्यासह सेनेचे माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे यांचा समावेश आहे. माघी गणेश जयंतीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु मंगळवारीही उमेदवारांनी निवडणूक कार्यालयाकडे पाठ फिरविली.
नाशिक पूर्व विभागात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात प्रभाग १३ मधून विद्यमान नगरसेवक सुरेखा भोसले आणि प्रकाश कनोजे, प्रभाग १६ मधून सेनेचे माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे, प्रभाग २३ मधून वैशाली कटारे, प्रभाग १४ मधून गोविंदा बिरुटे व फरीन सय्यद यांचा समावेश आहे. गेल्या पाच दिवसांत पूर्व विभागात आतापर्यंत नऊ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. पाच दिवसांत प्रभाग १६ आणि २३ मधून एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. मात्र, मंगळवारी या दोन्ही प्रभागात अर्जाचे खाते खोलले गेले. प्रभाग ३० मधून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. मंगळवारी माघी गणेश जयंतीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, अद्याप प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्याच घोषित न झाल्याने त्याचा परिणाम नामनिर्देशनपत्र दाखल करण्यावरही झाला आहे. आता शेवटचे तीन दिवस उरले असून, या काळात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. मनसेच्या विद्यमान नगरसेवक व सभागृहनेत्या सुरेखा भोसले यांनी कोणत्याही पक्षाच्या नावाचा उल्लेख न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. वास्तविक विद्यमान नगरसेवक म्हणून भोसले यांची मनसेकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, दोन दिवसांपासून भोसले या कॉँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असल्याने त्यांच्या अपक्ष अर्जामुळे पक्षांतराच्या चर्चेला जोर आला आहे.