इराकमध्ये अडकलेले सहा अभियंते अखेर मुंबईकडे रवाना
By admin | Published: June 25, 2014 01:20 AM2014-06-25T01:20:28+5:302014-06-25T01:20:28+5:30
इराकमधील दहशतवादी हल्ल्याचा थरार अनुभवलेले मुंबई-पुण्यातील सहा अभियंते अखेर बुधवारी पहाटे सुखरुप भारतात परतणार आहेत.
काम अर्धवट सोडले : बुधवारी पहाटे ४.३० वाजता मुंबई विमानतळावर उतरणार
यवतमाळ : इराकमधील दहशतवादी हल्ल्याचा थरार अनुभवलेले मुंबई-पुण्यातील सहा अभियंते अखेर बुधवारी पहाटे सुखरुप भारतात परतणार आहेत.
प्रकल्प व्यवस्थापक विजय बळीराम तावडे यांच्या नेतृत्वात हे पथक इराकमध्ये कार्यरत होते. या पथकात मोहम्मद सय्यद अहमद, लियाकत अली, मोहम्मद वाजीद अन्सारी, शमशाद अली, मोहम्मद अलीशर अन्सार यांचा समावेश आहे. त्यातील पाच मुंबईचे तर एक पुण्याचा रहिवासी आहे. बुधवार दि. २५ जून रोजी पहाटे ४.३० वाजता त्यांचे अरेबियन एअर लाईन्सच्या विमानाने मुंबईला आगमन होत आहे. मुले सुखरुप परतणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हे सहाही अभियंते पुण्यातील डॅसेस आयटी इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीचे अधिकारी आहेत. सदर कंपनीने इराकच्या काबूल शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल निर्मितीचे कंत्राट मिळविले होते. हॉस्पिटलमधील आयटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी या अभियंत्यांना मुंबई-पुण्याहून इराकमध्ये पाठविण्यात आले होते. परंतु दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी हल्ले केल्याने इराकमध्ये वातावरण असुरक्षित झाले. तेथे सुरू असलेला थरार या अभियंत्यांनी अनुभवला. इराकमध्ये कुणाचाही जीव सुरक्षित नसल्याची जाणीव झाल्याने अखेर कंपनीने त्या सहाही अभियंत्यांना काम अर्धवट सोडून परत बोलविण्याचा निर्णय घेतला. एक्झिट व्हिसाच्या प्रतीक्षेत या अभियंत्यांचा भारतात परतीचा प्रवास आठवडाभर लांबला. मात्र अखेर हे सहाही अभियंते अरेबियन विमानाने नजफ विमानतळावरून मुंबईसाठी रवाना झाले असून २५ जूनला पहाटे ते मुंबईत पोहोचणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)