कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या
By Admin | Published: June 29, 2016 05:25 AM2016-06-29T05:25:38+5:302016-06-29T05:25:38+5:30
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच विदर्भात एकाच कुटुंबातील सहा जणांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली.
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच विदर्भात एकाच कुटुंबातील सहा जणांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. मृतांमध्ये चार भावंडं आणि त्यांच्या दोन भाच्यांचा समावेश आहे. या कुटुंबातील सर्व सदस्य अविवाहित होते, त्याच नैराश्यातून त्यांनी जीवन संपवले असावे, अशी चर्चा आहे.
चव्हाण कुटुंबाचे राहत्या घराशेजारीच किराणा दुकान असून, ‘बिट्टीबाईचे दुकान’ म्हणून ते अंजनगावात प्रसिद्ध आहे. मृत लक्ष्मी व मंगला यांची आई उषाबाई बारड या याच परिसरात काही अंतरावर मुलगा रोशनसह राहतात. मंगळवारी दुपारपर्यंत चव्हाण यांचे किराणा दुकान व घर उघडले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी रोशनला याची माहिती दिली असता त्याने घरात वरून प्रवेश केला. आतील दृश्य पाहून तो नि:शब्द झाला. थोड्या वेळाने हंबरडा फोडत तो घराबाहेर आला. त्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. घरात दोन महिला, दोन मुलींसह दोन पुरुष मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या शेजारी मोनोक्रोटोफॉस नामक विषारी औषधांच्या दोन बाटल्या आढळल्या. घटनेचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरताच घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
> मृतांमध्ये प्रफुल्ल नारायण चव्हाण (४८), विवेक नारायण चव्हाण (४०), लक्ष्मी नारायण चव्हाण (५०), मंगला नारायण चव्हाण (५२) ही बहीणभावंडे आणि कामिनी अरूण बारड (२९) व रोशनी अरूण बारड (२६) या दोन भाची यांचा समावेश आहे. या घटनेने अंजनगाव सुर्जी हादरून गेले आहे.