आजी-माजी लोकप्रतिनिधींसह सहा अर्ज दाखल
By admin | Published: January 31, 2017 07:34 PM2017-01-31T19:34:49+5:302017-01-31T19:34:49+5:30
महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी पंचवटी विभागातून आजी-माजी नगरसेवकांसह सहा इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी पंचवटी विभागातून आजी-माजी नगरसेवकांसह सहा इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पंचवटी विभागात सहा प्रभाग असून, यात मंगळवारी प्रभाग क्रमांक १ मधून ३, प्रभाग ३ मधून १, प्रभाग ४ मधून १, तर प्रभाग क्रमांक ६ मधून १ असे सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या कामात पंचवटीतील भाजपाकडून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी आघाडी घेतली आहे. भाजपाकडून तीन, मनसेकडून एक, तर राष्ट्रवादी कॉँग्रेस व अपक्ष एक असे अर्ज दाखल झालेले आहेत. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ मधून भाजपाच्या विद्यमान नगरसेवक रंजना भानसी यांनी ब गटातून, तर माजी नगरसेवक अरुण पवार यांनी ड गटासाठी भाजपाकडून तसेच मनसेकडून जयश्री पवार यांनीही अनुसूचित जमाती जागेसाठी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधून सचिन अहिरे यांनी ड गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ४ मधून माजी नगरसेवक रुक्मिणी कर्डक यांनी अनुसूचित जाती गटातून अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधून कविता आव्हाड यांनी ब गटातून अर्ज दाखल केला आहे.