सहाऐवजी आठ तासांची शाळा!
By admin | Published: November 15, 2015 02:10 AM2015-11-15T02:10:52+5:302015-11-15T02:10:52+5:30
विद्यार्थ्यांमध्ये चांगली आकलन क्षमता निर्माण करण्यासाठी शाळा सहाऐवजी आठ तास करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे
पुणे : विद्यार्थ्यांमध्ये चांगली आकलन क्षमता निर्माण करण्यासाठी शाळा सहाऐवजी आठ तास करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचा कालावधी सहावरून आठ तास केल्यास त्यांची आकलन क्षमता चांगली होईल, असा दावा शालेय विभागाने केला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या महाराष्ट्रासंदर्भातील संकेतस्थळावर जाहीर केलेल्या अहवालात वेळ वाढविण्याची बाब शालेय विभागाने अधोरेखित केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन राष्ट्रीय धोरण राबविण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारने १४ शैक्षणिक बाबी घेऊन त्यावर आधारित विविध प्रश्नांवर गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर चर्चा घेऊन त्यासंबंधीचा अहवाल आॅनलाइन सादर करण्याचे राज्य सरकारला आदेश दिलेले होते. त्यानुसार हा प्रस्ताव राज्याच्या शालेय विभागाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. या अहवालामध्ये १४ शैक्षणिक बाबींची मुद्देसुद मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठीच्या शिफारशी सुचिवण्यात आल्या आहेत.
अहवालानुसार विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्या वृद्धीसाठी व विकासासाठी शाळा या सहाऐवजी आठ तासांच्या कराव्यात असा मुद्दा मांडण्यात आला आहे. विविध अहवालांच्या आधारे शालेय विभागाने हा प्रस्ताव सादर केल्याचे अहवालात नमूद केले आहे. यामध्ये सहा तास हे शैक्षणिक अभ्यासासाठी व उर्वरित दोन तास इतर प्रकारच्या अभ्यास, खेळासाठी वापराव्यात, असे सुचविले आहे. याचबरोबर, वाचन, लेखन, व्यवहार्य गणित कसे शिकता येईल याबाबत मांडणी केली आहे. उस्मानाबाद व आंबेजोगाईमध्ये विद्यार्थ्यांना व्यवहार्य गणित कळावे यासाठी बाजारात नेले जाते या प्रकारचे प्रयोग ही सांगितले आहेत.
परीक्षापद्धतीत बदल करून त्यात आॅनलाइन परीक्षा, मागणीनुसार परीक्षा तसेच ओपन बुक परीक्षा घेण्यात याव्यात. व्यवस्थापनात टॅबलेटमध्ये विविध सॉफ्टवेअर घेऊन वापर करण्यावर जोर द्यायला हवा. या अहवालावर शिफारसी, सूचना असल्यास २ूँङ्मङ्म’ील्लल्लीस्र@ॅें्र’.ूङ्मे या ई- मेल आयडीवर पाठवाव्यात. याची अंतिम मुदत २३ नोव्हेंबर आहे.