धुळगावला रात्रीत सहा घरे फोडली
By admin | Published: October 31, 2016 04:55 AM2016-10-31T04:55:59+5:302016-10-31T04:55:59+5:30
दिवाळीच्या धामधुमीत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सहा घरे फोडून सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली.
तासगाव/सोनी : तासगाव तालुक्यातील धुळगाव येथे ऐन दिवाळीच्या धामधुमीत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सहा घरे फोडून सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. शनिवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. सहा ते सात घरांत घरफोडीचा प्रकार झाला. सुमारे अकरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि चांदीच्या वस्तू आणि मोटारसायकल लंपास केली आहे. या दरोड्याच्या घटनेने धुळगावसह परिसरातील नागरिकांत घबराट निर्माण झाली असून, याबाबत तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळगाव येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामपंचायतजवळील तसेच राम मंदिराशेजारील चार घरात, तसेच गावाबाहेरील दोन घरात चोरट्यांनी हात साफ केला. त्यापैकी कुलूपबंद असलेल्या दोन घरांचे दरवाजे कटावणीच्या साहाय्याने उघडून कपाट, तसेच सुटकेस फोडून त्यातील मुद्देमाल लंपास केला. सतीश भीमराव जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून सव्वा तोळे सोने, सात हजार रुपये, चांदीच्या गणेशमूर्तीसह अन्य भांडी लंपास केली.
शामगोंडा सिदगोंडा पाटील यांच्या घराजवळून स्प्लेंडर (एमएच १० बीई ६९७९) ही दुचाकी चोरीस गेली. बाबासाहेब लालासाहेब डुबल यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुटकेसमधील साडेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने, दहा हजार रुपये लंपास केले. मन्सूर बाळू मगदूम यांच्या घरातून पाऊण तोळे सोने आणि पंधरा हजार रुपये लंपास केले.
शरदराव केशवराव डुबल यांच्या घरातून मोबाईल आणि बाराशे रुपये लंपास केले. रामचंद्र धोंडी गायकवाड यांच्या घरातून पेटी फोडून पाचशे रुपये लंपास केले. चोरीसाठी वापरण्यात आलेली कटावणी आणि कुऱ्हाड यावेळी सापडली. चोरीची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांच्यासह पथकाने घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
>चोरी सत्राने घबराट
मुख्य रहदारीच्या रस्त्यापासून धुळगाव हे गाव आडबाजूला आहे. या गावात मध्यरात्री सहा ठिकाणी चोरी झाल्याने गावासह परिसरातील गावात घबराटीचे वातावरण आहे. चोरट्यांनी एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरी करुन घरातून पळवून नेलेल्या सुटकेस, पेट्या गावाबाहेर शेताकडेला फेकून दिल्याचे निदर्शनास आले.