सहा आयएएस १५ दिवसांत बदलले
By Admin | Published: May 13, 2016 03:51 AM2016-05-13T03:51:09+5:302016-05-13T03:51:09+5:30
प्रशासकीय फेरबदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ एप्रिल रोजी तब्बल ७३ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या घाऊक बदल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती
मुंबई : प्रशासकीय फेरबदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ एप्रिल रोजी तब्बल ७३ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या घाऊक बदल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. आज त्यातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करून त्यांना नवीन वा आधीचे पोस्टिंग देण्यात आले.
दिलीप शिंदे हे महानंदचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. एस.एस. डुंबरे हे पुणे येथे भूमी अभिलेख विभागाचे नवे उपसंचालक असतील. शैलेश नवल हे वर्धेचे, आशुतोष सलिल चंद्रपूरचे ,तर रंगा नायक गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी असतील. संपदा मेहता या पुण्याच्या कृषी संशोधन परिषदेच्या नवीन प्रकल्प संचालक असतील. राहुल रेखावार हे अकोलाचे नवे व्यवस्थापकीय संचालक तर संजय मीना हे वस्रोद्योगचे (नागपूर) नवे संचालक असतील.
२७ एप्रिलच्या बदल्यांमध्ये संपदा मेहता यांना अहमदनगरचे जिल्हाधिकारीपद देण्यात आले होते. आता तेथे अनिल कवडे कायम असतील. कवडे यांची एकात्मिक बालविकास सेवा योजनेत केलेली बदली रद्द झाली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी आधी करण्यात आलेली बदली आज रद्द करण्यात आली. ते पालघरमध्ये कायम असतील. पालघरच्या जिल्हाधिकारीपदी शैलेश नवल यांची आधी झालेली बदली आता रद्द झाली असून, त्यांना याच पदावर वर्धेला पाठविण्यात आले आहे. संजय मिना यांना यांची आधी महाबीज; अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून केलेली बदली रद्द झाली. (विशेष प्रतिनिधी)