मराठवाड्यात वीज पडून सहा ठार
By admin | Published: June 4, 2016 03:27 AM2016-06-04T03:27:05+5:302016-06-04T03:27:05+5:30
बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली
औरंगाबाद : बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विविध ठिकाणी वीज कोसळून सहा जणांसह सहा शेळ्या व दोन म्हशी दगावल्या तर चार जण जखमी झाले.
बीड शहरासह तालुक्यातील केतूरा, लिंबा रूई भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान घरावरील पत्रे उडून गेले. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे सायंकाळी ५ वाजता पावसाला सुरुवात झाली. धारूर तालुक्यातील आसरडोह (जि.बीड) येथील अर्जुन सखाराम काळे (५३) हे शेतामध्ये बेलाची पाने आणण्यासाठी गेले होते. यावेळी वीज कोसळली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील दत्तनगर भागात बाभळीच्या झाडावर वीज कोसळल्याने शेतकरी बळीराम देवीदास शिंदे यांच्या झाडाखाली बांधलेल्या दोन म्हशी जागीच दगावल्या. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे वादळीवाऱ्यामुळे घराच्या पत्र्यावरील दगड डोक्यात पडल्याने महिलेचा तर आर्वी येथील ३२ वर्षीय अशोक रामराव कदम शेतकऱ्याचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला.
उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब व वाशी तालुका व परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला़ ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती़ तर कळंब तालुक्यातील नायगाव शिवारात वीज पडल्याने सुब्राव माने व पापा शेख यांच्या सहा शेळ्या ठार झाल्या़ तर बाळू वामन मोटे (४५) या मेंढपाळाचा मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)